ब्रेकिंग
विंचूर येथे महिलांना शासकीय योजनांचे आमिष; दिव्यज्योत संस्थेच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक

0
4
6
8
5
8
महिलांना शासकीय योजनांचे आमिष; दिव्यज्योत संस्थेच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक
किरण कुमार आवारे…
शिरवाडे वाकद :- निफाड तालुक्यातील विंचूर येथे महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुमारे ६४ महिलांची तब्बल २ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सौ.मनिषा प्रमोद कडलग (वय ३५) रा.लोळगे वस्ती, हनुमान नगर, विंचूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी संजय अभिमान बोराळे (वय ४२), दुसरी महिला आरोपी (वय ३५) दोघे रा.सोहम सिटी, लासलगाव, तसेच विशाल कान्हू गरूड (वय ३३) रा.कोटमगाव ता.निफाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा मूळ पत्ता नांदगाव साकोरे ता. नांदगाव असा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, आरोपींनी विंचूर येथे ‘दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्था’ स्थापन करून महिलांना मोफत शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन व १५ हजार रोख मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय पिठगिरणी, वॉशिंग मशीन, फ्रिज यांसारख्या वस्तू फक्त २५ टक्के रक्कम भरून मिळतील, उर्वरित रक्कम शासन अनुदानातून भरण्यात येईल, असे महिलांना आमिष दाखवण्यात आले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादी महिलेने गावातील ३० महिलांचा गट तयार करून दिला. आरोपींनी काही महिलांना प्रशिक्षण देत १५ हजारांचे धनादेशही दिले. त्यामुळे महिलांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर आरोपींच्या सांगण्यावरून विशाल गरूड याने गावोगावी जाऊन महिलांकडून ऑनलाईन फोन पे च्या माध्यमातून पैसे जमा केले. त्यात फिर्यादी महिलेचे २० हजार व विंचूर येथील सुमारे ६४ महिलांकडून प्रत्येकी ३५०० ते १० हजारांपर्यंत रक्कम घेण्यात आली. एकूण अंदाजे २ लाख ५० हजार रुपये जमा करूनही महिलांना कोणतीही वस्तू देण्यात आली नाही. उलट वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत आरोपींनी फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सदर टोळीकडून निफाड, सिन्नर, येवला व इतर तालुक्यांतील महिलांकडूनही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात जी.आर. क्र. १५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.
0
4
6
8
5
8



