लालपरीची चाके पुन्हा एकदा थांबण्याची चिन्हे
रविवार विशेष…
किरण घायदार …
ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लालपरीची चाके पुन्हा एकदा थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होऊन एकनाथ शिंदे यांना दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने ९ ऑगस्ट पासून संपावर जाण्याची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती. या संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समि तीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठक तातडीने घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात शासनाला सादर करण्याचेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे ९ ऑगस्टला होणार संप तूर्तास स्थगित झाला असून येणाऱ्या काळात यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास हा संप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सण आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप हे समीकरण जणू ठरलेले आहे. २०२१ मध्ये ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने राज्यातील जनतेचे पुरते हाल झाले होते, आता गणेश चतुर्थीच्या तोंडावर संपाची घोषणा झाल्याने राज्य सरकार याबाबत काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गणेश चतुर्थीला एक महिन्याहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून दरवर्षी लाखो चाकरमानी गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या गावी कोकणात जात असतात. चाकरमान्यांच्या सोयीसाठी दरवर्षी राज्य शासनाकडून एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राज्य शासनाकडून ४३०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, त्यापैकी २०३१ गाड्धा पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. कोकण रेल्वे सुरु होण्यापूर्वी गणेश चतुर्थीनिमित्त कोकणात जाणाऱ्या अधिकांश चाकरमान्यांचा भार एकटी एसटी उचलत असे.
कोकण रेल्वे सुरू झाल्यावर हा भार काही प्रमाणात कमी झाला असला तरी कोकणात जाणारा एकेरी रेल्वेमार्ग, गाड्यांची मर्यादित संख्या आणि ग्रामीण वस्त्यांपासून रेल्वे स्थानकांचे मोठे अंतर यांमुळे रेल्वेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या तशी मर्यादित आहे, तरीही रेल्वेकडून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सोडण्यात येणाऱ्या जादा रेल्वे गाड्याही दरवर्षी दुथडी भरून वाहत असतात. एसटी मागोंचे जाळे राज्यभरात गावागावांत पसरले आहे. गणेश चतुर्थीनिमित्त गावी जाणारा चाकरमानी आपल्यासोबत आपल्या कुटुंबालाही सोबत घेऊन जात असतो. याशिवाय गणेश चतुर्थीनिमित्त केलेली खरेदी, मखर इत्यादी साहित्य सोबत नेत असल्याने गावात घराजवळ थांबणाऱ्या एसटीचा त्याला मोठा आधार असतो. नोकरी व्यवसायासाठी शहरात येऊन राहिलेल्या चाकरमान्यांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागली असून गणेश चतुर्थीच्या निर्मित्ताने स्वतःची अथवा भाड्याने चारचाकी गाडी घेऊन गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील चाकरमान्यांच्या संख्येतही वर्षागणिक तेव्हढीच वाढ होत असल्याने शासनाने दरवर्षी कितीही जादा गाड्या सोडल्या तरी त्या कमीच पडतात. ग्रामीण भागातील अनेकांची दिनचर्या सर्वस्वी एसटी बसेसवर अवलंबून आहे. गावातून शहरात शिक्षणासाठी जाणारे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिदिन एस्टीनेच प्रवास करत असतात. आठवडी बाजारात खरेदीसाठी जाणारी ग्रामस्थ मंडळी असो, माहेरी पाहुणचार घेण्यासाठी आलेली नवविवाहिता असो वा खरेदी विक्रीसाठी तालुक्यात व दुसऱ्या गावात प्रवास करणारी मंडळी असो सर्वांनाच इच्छित स्थळी नेण्याचे आणि आणण्याचे काम एसटी करत असते. नोकरी व्यवसायासाठी ग्रामीण भागातून तालुक्यात ये जा करणाऱ्यांना सर्वस्वी एसटीचाच आधार असतो. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सांभाळण्याचे महत्वाचे काम एसटी करत आहे. आजमितीला राज्यभरात एसटीचे २५० प्रमुख डेपो असून, यात वाहक चालक मिळून जवळपास ५० हजार कर्मचारी काम करतात. एसटीच्या कार्यालयांत आणि कार्यशाळांत नोकरी करणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ हजारांच्या घरात आहे. हे सर्व कर्मचारी संपावर गेल्यावर ग्रामीण भागातील दळणवळणच जवळपास ठप्प होणार आहे.
२०२१ मध्ये ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी। केलेला संप ५४ दिवस चालू होता. या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या. या संपाचे भांडवल करून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी प्रचंड आसूड ओढले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करण्यात आला होता. या दरम्यान जनतेचेही अतोनात हाल झाल्याने सुरुवातीला ( एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने असलेले जनमत हळूहळू कर्मचाऱ्यांच्या विरोधात परिवर्तित होऊ लागले होते. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करून अखेर संप मिटवण्यातआला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसण्याची तयारी केली आहे. गणेशोत्सवात एसटीचा संप झालाच तर त्याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या मिळवतील. सामान्य प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारतील. अन्य काही मार्ग नसल्याने या लुटीचा मोठा फटका चाकरमान्यांना बसणार आहे.
मासिक वेतनवाढीसह एप्रिल २०१६ पासून वेतनवाढीचा फरक, घरभाडे भत्ता वाढीचा फरक, महागाई भत्तावाढीचा फरक मिळावा, अशा महत्त्वाच्या आर्थिक मागण्यांच्या सोडवणुकीसाठी एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. मागील संपाच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे पक्ष आता सत्तेत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणे विद्यमान सरकारची नैतिक जबाबदारी असणार आहे. यावर वेळीच निर्णय घेतला गेला नाही आणि भविष्यात या संपाने उग्र स्वरूप धारण केले तर चाकरमान्यांचा रोष सरकारलाच सहन करावा लागणार आहे. आपल्या मागण्यांसाठी विनाकारण जनतेला वेठीस धरणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनाही जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. येणाऱ्या काळात राज्य सरकार यातून काय मार्ग काढते ते पाहणे आता महत्वाचे आहे.
एसटी महामंडळ इंधन खरेदीवर अधिभार, टोल व प्रवासी कराच्या रुपात वर्षाला एक हजार ते १२०० कोटी रुपये राज्य सरकारला देते. ही रक्कम राज्य सरकारने माफ करावी. जेणेकरुन महामंडळाला अतिरिक्त एक ते १२०० कोटी रुपये मिळतील, असा प्रस्ताव कामगार संघटनांच्या विचाराधीन आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटी महामंडळाला सक्षम करुन कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यासाठी राज्य सरकाराने उच्चाधिकारी समितीची बैठक घेऊन अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश दिले असून ही समिती काय अहवाल देते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
????
किरण घायदार
Mo 9370081613