*येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांचा २६ हजार ४०० मताधिक्याने विजयी*
*ढोल ताशांचा गजर,गुलाल उधळत,फटाक्यांची आतषबाजी करत येवला संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष*
*येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय-मंत्री छगन भुजबळ*
*जातीपातीची दादागिरी येवला लासलगाव मतदारसंघात चालणार नाही हे जनतेने दाखवून दिले-छगन भुजबळ*
*नाशिक,येवला,दि.२३ नोव्हेंबर:-* येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच विकासाला आड येणाऱ्यांना येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे हा विजय येवला मतदारसंघातील नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय असून मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ४०० मतांनी विजयी झाल्यानंतर येवला संपर्क कार्यालय परिसरात ढोल ताशांचा गजर, गुलाल उधळत,फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रचार प्रमुख अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,डी.के.जगताप, पंढरीनाथ थोरे,हुसेन शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थितीत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात आपण विकासाला प्राधान्य दिले.आपण केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली. आपण जातीवाद पुढे करून निवडणूक लढवली नाही. मात्र काही लोकांनी या मतदारसंघात जातीपातीचे विष पसरविण्याचे काम केल. मात्र येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांच्या जातीपातीच्या दादागिरीला थारा न देता विकासाला कौल दिला. त्यामुळे हा विजय या मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी जनतेचा विजय आहे. येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास म्हणजे जातीवादाला चपराक असून मी सर्वांचे आभार मानतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, मतदारसंघात विकास करतांना आपण कुठल्याही जातीपातीचा विचार केला नाही. विकास हे एकमेव धेय्य आपण नेहमीच ठेवले. मात्र काही लोकांनी जातीच विष पेरल्याने काही लोक जातीपातीच्या राजकारणाला बळी पडले. त्यामुळे काही मते आपली कमी झाली. असे असले तरी मतदारसंघातील जनता ही जातीय वादाला खत पाणी घालू इच्छित नाही हे स्पष्ट झाले आहे. सर्व जातीधर्माच्या बांधवांनी कष्ट घेतले. ओबीसी,एसटी एसीसह,मुस्लीम अल्पसंख्यांक, मराठा सर्व समाज बांधवांनी आपल्याला पाठींबा दिला. आपल्या विजयात या सर्व समाज बांधवांचे विशेष योगदान आहे. विशेषतः अनेक मराठा बांधव विरोध पत्कारून माझ्या विकासाच्या पाठीशी उभे राहिले या सर्वांचा मी मन:पूर्वक आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपला हा महाराष्ट्र छत्रपती,शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जातीपातीला थारा आजीबात दिला जात नाही. त्यामुळे सर्व लोक आपल्यापाठीशी एकनिष्ठपणे उभे राहिले.हा छत्रपती,शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी होता आणि तो पुरोगामी राहणार हे जनतेने आजच्या निकालातून दाखवून दिलं असल्याचे त्यांनी सांगितले.