Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

दिव्यांगांना मिळणार विनामूल्य अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय

0 3 2 1 2 3

दिव्यांगांना विनामूल्य अत्याधुनिक
कृत्रिम मॉड्युलर पाय मिळणार…

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. यांच्या आर्थिक मदतीने भारत विकास परिषद, नाशिक आणि विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने विनामूल्य दिव्यांग शिबिर नाशिक येथे दि. २९ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. पत्रकार परिषदेत भारत विकास परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष हेमंत गोखले यांनी स्वागत केले. विकलांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि अत्याधुनिक मॉड्युलर पायांविषयी माहिती दिली.
या सेवाभावी उपक्रमाची माहिती देताना खटावकर म्हणाले, अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची बाजारात किंमत रुपये ५० हजारापेक्षा जास्त व हाताची किंमत २० हजारापर्यंत आहे. असे कृत्रिम अवयव या शिबिरात ४०० दिव्यांगांना विनामूल्य देण्यात येतील तसेच या शिबिरात मिळणारा पाय परंपरागत जयपुर फूटपेक्षा कसा अत्याधुनिक आहे याची माहितीही त्यांनी सांगितली. विकलांग पुनर्वसन केंद्राला कोणतीही सरकारी मदत नसल्याने कागदपत्रात न अडकता, कोणतेही निकष न लावता सर्व दिव्यांग्यांना ही सेवा विनामूल्य दिली जाते. समाजासाठी चालविण्यात येणारा हा सेवा यज्ञ आहे. या सेवा यज्ञात महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. आता सहभागी झाली असून अन्य इतर कंपन्यांचे / संस्थांचे आर्थिक सहकार्य संस्थेला मिळत असते. असे त्यांनी नमूद केले.
भारत विकास परिषद एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व त्यांच्यात राष्ट्रभाव, राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी, सेवा व संस्कार क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणारी संस्था आहे. सद्यस्थितीत विविध राज्यात मिळून संस्थेची कायमस्वरूपी १३ विकलांग केंद्रे आहेत. महाराष्ट्रातील कायमस्वरूपी विकलांग केंद्र पुणे येथे १९९८ पासून कार्यरत असून दरवर्षी सुमारे ३००० दिव्यांगाना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसवण्यात येतात. केंद्रातील वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री व प्रशिक्षित तज्ञांच्या द्वारे सर्व कृत्रिम अवयव बनवले जातात. पाय बसविल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे इत्यादी प्रकारची दैनंदिन क्रिया करू शकतात. याबाबत केंद्रावर तज्ञांमार्फत सराव / मार्गदर्शनही केले जाते.
डिसेंबर महिन्यात पुणे येथे रा. स्व. संघ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत महादिव्यांग शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १०३६ लाभार्थ्यांचे कृत्रिम अवयव देण्यासाठी मोजमाप घेण्यात आले. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले – पाटील यांनी सांगितले की, या सेवाभावी उपक्रमाची लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. भारत विकास परिषदेच्या सचिव मेघा बुरकुले यांनी आभार मानले.

सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक
शंकराचार्य न्यास (संकुल), जुना गंगापूर नाक्याजवळ, नाशिक येथे शिबिर होणार असून शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी शिबिराची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत वेळ आहे. नोंदणीसाठी कुलकर्णी – ८७६६४५३१९२ आणि संजीव – ७०२८०४५९५५ यांच्याशी संपर्क साधावा.
पूर्वनोंदणी शिवाय शिबिरात प्रवेश नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. प्रथम नोंदणीला प्राधान्य असल्याने दिव्यांगांनी त्वरित नोंदणी करावी. गरजूंनी संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे