एक नवा, धमाल चित्रपट “एक दोन तीन चार”
जिओ स्टुडिओज निर्मित आणि वरुण नार्वेकर घेऊन येत आहेत, गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट “एक दोन तीन चार”
आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीझ झालाय.
ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पुढे काय घडेल हा एक सस्पेन्सच आहे. चित्रपटातील जोडपं, समीर आणि सायलीच्या लव्ह स्टोरीच्या आनंदी आयुष्याचं रूपांतर रोलरकोस्टर राईड प्रमाणे कोणकोणत्या वळणावर जातं याची हिंट हा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला येते.
सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो कि अगदी वयाच्या २३ व्या वर्षी सम्या आणि सायली या जोडप्याच लग्न झालंय, पण त्यानंतर लगेचच गोड बातमी सुद्धा येते. आणि ह्या गोड बातमीव्दारे जो एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय त्याने त्यांची जी तारांबळ उडते याची एक धमाल गोष्ट यात पहायला मिळते.
ट्रेलर बघताना आधी वाटतं की ह्यांना एक नाही दोन नाही तर चक्क ४ मुलं होणारं आहेत. पण ट्रेलरच्या शेवटी वैदेहीने सहा बाळांची बातमी देऊन गुगली टाकली आहे. आता यांना चार का सहा याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
‘मुरांबा‘ सारख्या बहुचर्चित आणि नावाजलेल्या चित्रपटानंतर तरूण दिग्दर्शक वरूण नार्वेकर याचा पुढील चित्रपट कधी येणार याची अनेक दिवस प्रेक्षक आणि मिडीयासुद्धा वाट पहात होते. आणि आता “एक दोन तीन चार” या चित्रपटाच्या घोषणेने ही उत्सुकता अधिक वाढली आहे.
वैदेही परशुरामी आणि निपूण धर्माधिकारी अभिनित ही नवी गोड जोडी या अनपेक्षित सरप्राईझला कसे सामोरे जाणार हे बघणं प्रेक्षकांसाठी गमतीदार ठरणार आहे.
“एक दोन तीन चार” हा चित्रपट जितका यंग जनरेशन साठी आकर्षक आहे तितकाच तो सर्व कुटुंबासाठी सुद्दा एक मेजवानी ठरणार आहे. कारण प्रत्येक जोडप्याबरोबर सर्व कुटुंबच या प्रवासात सहभागी होत असतं. आणि याच कुटुंबाचा भाग म्हणून या दोघांबरोबर मराठीतील दमदार कलाकार जसं मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकार या कथेतील कुटुंबाचा प्रमुख भाग असणार आहेत.
मुख्य म्हणजे सोशल मीडियाचे आजचे भारताचे नावाजलेले स्टार्स करण सोनावणे आणि यशराज मुखाटे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत. करण पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. तर यशराज मुखाटे एक म्युझिक डिरेक्टर म्हणून “एक दोन तीन चार” या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण करतो आहे. त्यामुळे हा चित्रपट टोटल एन्टरटेनर असणार आहे ह्यात काही शंका नाही.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मित बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने “एक दोन तीन चार” हा चित्रपट १९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.