Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

येवला मतदार संघातील ग्राहकांना मिळणार २४ तास मुबलक वीज सेवा

0 2 5 5 5 9

*राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….*

*सुधारित वितरण क्षेत्र (आर.डी.एस.एस )योजनेतून येवला मतदारसंघातील विद्युत केंद्रांचे होणार बळकटीकरण….*

*ग्राहकांना मिळणार २४ तास मुबलक वीज सेवा…*

*नाशिक,येवला,दि.२७ फेब्रुवारी :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आर.डी.एस.एस अर्थात सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून येवला मतदारसंघातील विद्युत केंद्रांचे होणार बळकटीकरण करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून टीडीओ मीटर बसविणे, गावठाण फीडर विलगीकरण, उच्च व लघुदाब विद्युत वाहिन्यांचे बळकटीकरण व वीज हानी कपात करणे, नवीन उपकेंद्र निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र बसविणे इत्यादी कामांचा समावेश असणार असून या माध्यमातून घरगुती व वाणिज्य ग्राहकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा होणार आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला विधानसभा मतदासंघातील शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक, वाणिज्य वापरकर्ते यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध व्हावी यासाठी त्यांच्याकडून सातत्याने महावितरणकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार मतदारसंघात सुधारित वितरण क्षेत्र योजना (आर.डी.एस.एस) व कृषी धोरण योजना (एसीएफ) या योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी करण्यात येत आहे. आरडीएसएस फिडर सेप्रेशन योजनेअंतर्गत गावठाण आणि शेतीपंपासाठी वेगळे असे दोन भाग होणार आहे. आरडीएसएस लॉस रीडक्शन योजनेअंतर्गत एसीकेबल टाकण्यात येऊन कंडक्टर बदलणे, अपग्रेड करणे ही कामे करण्यात येणार आहे. त्यानंतर रोहीत्रांवरील अनधिकृत भार कमी होऊन रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे लवकरच मतदारसंघातील संपूर्ण विद्युत केंद्रांचे बळकटीकरण होऊन ग्राहकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत येवला तालुक्यात ५६ एचव्हीडीएस २५ केव्ही रोहित्र बसविण्यात येत आहे. त्यासाठी ११ केव्हीची २० किलोमीटरची विद्युत लाईन टाकण्यात येत आहे. तसेच जुनी ७९ किमी एसी केबल काढून नवीन बसविण्यात येणार आहे. तसेच ६.६ किमी लघुदाब वाहिनी व २ किमी ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत निफाड तालुक्यात २३ नवीन फीडर, १३२ रोहित्र, १४७.४ उच्चदाब वाहिनी, ४१.४ लघुदाब वाहिनी, २६ एसडीटी अर्थात स्पेशल डिझाईन ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. तर येवला तालुक्यात ५१ नवीन फीडर, १३४ रोहित्र, २८९.५ उच्चदाब वाहिनी, ५९.५ लघुदाब वाहिनी, ५० एसडीटी अर्थात स्पेशल डिझाईन ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे.

सुधारित वितरण क्षेत्र योजना (आर.डी.एस.एस) योजनेच्या माध्यमातून येवला तालुक्यातील कुसूर, सोमठाण देश, चिचोंडी औद्योगिक वसाहत, पिंपळगाव जलाल येथे ५ एमव्हीएचे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर येवला तालुक्यातील कोटमगाव विद्युत उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीए करण्यासोबतच सावरगाव येथे ५ एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेतून जऊळ्के ता. येवला व खेडलेझुंगे ता.निफाड येथे नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत भरवस फाटा येथे ३३/११ केव्ही ५ एमव्हीए क्षमतेचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर देवगाव, विंचूर, कानळद विद्युत केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यात येऊन त्याची क्षमता १० एमव्हीए करण्यात येणार आहे. तर येवला शहरातील विद्युत केंद्राची क्षमता वाढवून ती ५ एमव्हीए करण्यात येणार आहे. याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे कृषी धोरण अर्थात एसीएफ योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील नगरसूल येथे ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविण्यात आले आहे. तसेच अंगुलगाव, बल्हेगाव येथे ५ एमव्हीए नवीन विद्युत उपकेंद्र तसेच निफाड तालुक्यातील खडक माळेगाव विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए व मरळगोई विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही कामे पूर्ण होऊन ग्राहकांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 5 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे