
शरद लोहकरे, लासलगाव…
माजी सरपंच जयदत्त होळकर आणि मा. जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब पाटील यांच्या गटाला लासलगाव ग्रामपंचायतीवर सत्ता राखण्यास यश मिळाले आहे. सरपंच अफजल शेख यांनी राजीनामा दिल्याने लासलगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवार दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये सौ. योगिता योगेश पाटील ह्या घवघवीत यश संपादन करून सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, रोहित पाटील, रेवती होळकर, सायली पाटील, योगिता पाटील आदी 5 ग्रामपंचायत सदस्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. दुपारी १ वाजता अर्ज छाननीची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी दाखल झालेले सर्व नामनिर्देशनपत्र पडताळणी करतांना कोणताही आक्षेप न आल्याने ते सर्व वैध ठरविण्यात आले.
दुपारी १.३० ते २ या वेळेत अर्ज माघारीच्या कालावधीमध्ये चंद्रशेखर होळकर, रेवती होळकर आणि सायली पाटील यांनी आपले नामनिर्देशनपत्र माघारी घेतले. सरपंच पदासाठी सौ योगिता पाटील आणि रोहित पाटील या दोघांचे अर्ज शिल्लक राहिल्याने सर्वानुमते गुप्त पद्धतीने मतदान घेऊन मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी देवकाते यांनी उपस्थिती सर्व सदस्यांना सौ योगिता पाटील यांना आयात, रोहित पाटील यांना वर्तुळ या आणि नोटा असे तीन चिन्ह असलेली मतपत्रिका दिली होती.
यावेळी १७ पैकी १६ सदस्य उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित सदस्यांनी मतदान केले ते सर्व वैध मतदान असल्याचे निवडणूक अधिकारी भाऊसाहेब देवकाते यांनी जाहीर करून दोन्ही उमेदवारांना पडलेली मते मोजण्यात आली. या वैध मतदानामध्ये सौ योगिता पाटील यांना १६ पैकी १० तर रोहित पाटील यांना ६ मते पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब देवकाते यांनी सौ योगिता पाटील यांना विजयी घोषित केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.
यावेळी पॅनलचे प्रमुख जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील यांचेसह उपसरपंच रामनाथ शेजवळ, सदस्य चंद्रशेखर होळकर, अमिता ब्रम्हेचा, अश्विनी बर्डे, सायली पाटील, रोहित पाटील, अमोल थोरे, सुवर्णा जगताप, रेवती होळकर, अफजल शेख, पुष्पा अहिरे, संगीता पाटील, संतोष पलोड, ज्योती निकम आदी सदस्य उपस्थित होते. तसेच यावेळी निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून भाऊसाहेब देवकाते यांनी काम बघितले तर त्यांना तलाठी नितीन केदार, ग्रामपंचायत अधिकारी लिंगराज जंगम यांचे सहकार्य लाभले.
निवडणूक प्रक्रिया पार पडत असतांना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी स.पो.नि. भास्करराव शिंदे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
१९२२ साली स्थापन झालेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या ३० व्या सरपंचपदी सौ.योगिता योगेश पाटील यांची निवड. – आजपर्यंत महिला सरपंच म्हणून कुसुम (आक्का) होळकर (२०००-२००५), श्रीमती संगिता शेजवळ (२०१५-२०२०) आणि आता सौ.योगिता पाटील यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. १९२२ साली स्थापन झालेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या ३० व्या सरपंचपदी सौ.योगिता योगेश पाटील यांना विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.