Breaking
ब्रेकिंगसामाजिक

वराती ऐवजी बाहुली नाट्यातून लेकीचा आयुष्यप्रवास

0 4 6 1 9 7

वराती ऐवजी बाहुली नाट्यातून लेकीचा आयुष्यप्रवास; कोथमीरे परिवाराचा अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम

शिरवाडे वाकद:- लग्न म्हणजे केवळ नाच – गाणी आणि जेवणावळ इतकंच नसतं; ते आई – वडिलांसाठी लेकीच्या आयुष्यभराच्या आठवणींचा भावूक प्रवासही असतो. निफाड तालुक्यात एका लग्नसमारंभात एका शिक्षकाने चक्क ‘बाहुली नाट्य’ सादर करून मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंतच्या आठवणी जिवंत केल्या. या अनोख्या आणि भावनिक उपक्रमामुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या.

         तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप ज्ञानेश्वर कोथमीरे यांची कन्या जान्हवी नुकतीच विवाहबंधनात अडकली. हळदीच्या दिवशी वराती ऐवजी आयोजित करण्यात आलेल्या संगीत संध्या कार्यक्रमात एक वेगळाच आणि मनाला भिडणारा प्रयोग पाहायला मिळाला.

या कार्यक्रमात योगेश वाल्मिक जगदाळे आणि श्रीमती नलिनी अहिरे यांनी ‘बाहुली नाट्य’ सादर करत जान्हवीच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास जिवंत केला. बाहुल्यांच्या माध्यमातून तिच्या जन्मापासून ते लग्नाच्या उंबरठ्यापर्यंतच्या आठवणी एकामागून एक उलगडत गेल्या आणि उपस्थित पाहुणेही त्या भावनिक प्रवासात नकळत सहभागी झाले.

या नाट्यात पावसाच्या रात्री दवाखान्याकडे जात असताना वाटेतच झालेला जान्हवीचा जन्म, तिचं पहिलं पाऊल, रांगणं, बालपणीच्या खोड्या तसेच बुद्धिबळ स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत गाठलेलं यश अशा अनेक आठवणी जिवंत करण्यात आल्या. बाहुल्यांच्या संवादातून या आठवणींना जणू शब्द मिळाले आणि आई – वडिलांच्या मनातील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. मुलगी मोठी होत असताना तिच्या भविष्याबद्दल आई – वडिलांच्या मनात असलेली काळजी, तिच्यासाठी योग्य जोडीदार कसा असावा, सासरचे वातावरण कसे असावे, या सगळ्याचा हळवा संवादही या नाट्यातून उलगडला. ‘मुलगी सासरी जाताना तिला तिथेही पोटच्या मुलीसारखे प्रेम मिळावे,’ ही आई – वडिलांची भावना प्रेक्षकांच्या मनाला भिडली. योगेश जगदाळे आणि श्रीमती नलिनी अहिरे यांच्या या कलाविष्कारामुळे लग्नाचा सोहळा केवळ पारंपरिक कार्यक्रम न राहता तो संस्कार, आठवणी आणि भावनांचा संगम ठरला. लेकीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा बाहुल्यांच्या माध्यमातून पुन्हा जगण्याचा हा प्रयोग अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.

आजवर लग्नसमारंभात नृत्य – गाणी, सादरीकरणे पाहायला मिळतात; मात्र मुलीच्या आयुष्याचा भावनिक प्रवास बाहुली नाट्यातून उलगडण्याचा हा उपक्रम अत्यंत वेगळा आणि हृदयस्पर्शी ठरला. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देणारा हा प्रयोग उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे