0
4
2
9
5
7
प्रवास… परतीचा
सागर निकाळे -निफाङ
पान्हवलेल्या डोळ्यांनी लेक जशी माहेरच्या भेटीच्या ओढीने सासरहुन माहेरच्या दिशेनं निघते. अगदी “माझे माहेर पंढरी” म्हणत प्रत्येक सासुरवाशीण म्हणजेच प्रपंच कर्तव्यात व्यापलेला समस्त वारकरी समुदाय सांप्रदायाच्या माहेरी अर्थात पंढरपूरला जाण्यासाठी व्याकूळ झालेला असतो. वारीला जाण्याचा आनंद मनी साठवत डोक्यावर गाठोड घेत न सुटणाऱ्या प्रपंच फेऱ्यातून मोक्ष मिळावा यासाठी उंबरा ओलांडून वारीत सहभागी होतो. साधारण महिनाभर पायी चालून वारकरी पंढरीला पोहोचतो आणि पंढरपूरच्या भक्तिमय मातीत मिसळून पांडुरंगात एकरूप होतो. रोज पंढरपूरच्या दिशेला धावणारी पावले ही अत्यंत उत्साहात पुढे पुढे सरसावत असतात कारण
ती ओढ असते पांडुरंगाची…..
ती भक्ती असते श्री सावळ्याची….
ते प्रेम असतं विठुरायाच…
तो जिव्हाळा असतो पंढरपूरच्या चंद्रभागे तिरी
असलेल्या राऊळातल्या
तरल आणि भक्तिमय लहरींचा…
भक्तिमय लहरी जेव्हा श्री सावळ्याच्या भक्तांच्या मनी संचारतात तेव्हा साक्षात पांडुरंग हृदयात वसतो आणि संपूर्ण अंतकरण पांडुरंगमय होते. आषाढी वारीत ज्या दिवसाची वारकरी अत्यंत तळमळीने आणि भक्ती भावाने ज्या क्षणांची वाट पाहत असतो तो क्षण आणि तो दिवस म्हणजे “आषाढी एकादशी” या दिवशी हा स्वर्ग सोहळा तिन्ही लोकी साजरा केला जातो. एकादशीचे महात्म्य हे श्रेष्ठतम आहे. महाराष्ट्राच्या कणाकणात पांडुरंगाची ही वारी अत्यंत प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी प्रत्येक पायी चालणाऱ्या वारकऱ्याला भेटीची तृष्णा लागलेली असते ती त्या सावळ्याच्या दर्शनाने विसावते. भक्तीसाठी तहानलेला भेटीसाठी व्याकुळलेला… विठूला जेव्हा भेटतो तेव्हा विठूची ही भक्तीची भूक भक्तास पाहून मिटते. पंढरपुरात सर्व भाविकांची आणि तिथल्या पंढरपूर वासियांची रेलचेल पाहता कुणी नातवांसाठी खेळण्या खरेदी करतो तर काहीजण लेकीबाळीसाठी हार बांगड्या… प्रत्येक जण आपापल्या परीने आठवण भेट घेतात तर पांडुरंगाचां आशिर्वाद आणि प्रसाद ही घेतात. तिथेच काही चिमुकले हाती चंदनाचा टिळा लावा असं निःस्वार्थपने सांगतात तर काही जण हातात तुळशीच्या माळा घेऊन ऊभे असतात. पंढरपुरात प्रत्येक भाविकांच्या कपाळी गोपी चंदनाचा टिळा हा एकतेच प्रतिक आहे .प्रत्येकांच्या डोळ्यांत ती ओढ दिसते जी प्रत्येकामध्ये माऊलीचे दर्शन देऊन जाते. प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाच्या पंढरीत एकरूप झालेला दिसतो. एकादशीचा उपवास आणि उपासना हया दोन भक्तिमय साधना ही साधी सरल आणि निरागस असते. एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो तेव्हा मात्र प्रत्येक जण जड अंतकरनाने निरोप देतो तेव्हा हृदयात पांडुरंगाची भेट झाली हे समाधान असते परंतु डोळयात पंढरीतून पुन्हा माघारी परतन्याची वेळ येते तेव्हा मात्र पांडुरंग माय बाप होऊन लेकीची पाठवणी करतो तशी प्रत्येक भाविकांची पाठवणी करतो. दिल्या घरी सुखी रहा म्हणत. सुखान संसार कर म्हणत एका माहेरवाशिनीची सासरी म्हणजेच प्रत्येकांच्या घरी आठवणी गाठोड्यात बांधून आशीर्वादाची शिदोरी बांधून पाठवतो.
परतीचा प्रवास हा पांडुरंगाप्रती प्रेमाचा असा प्रवाह असतो जो निरंतर वारीसवे चालत राहतो. पंढरीच्या वाटेवर चालणारी पाऊले परतीच्या वाटेवर थबकतात परंतु पांडुरंगाच्या प्रेरणेने आनंद द्विगुणित करत चालून चालून थकलेलं शरीर तितक्याच उत्साहात घरट्याच्या दिशेने निघतो मात्र राम कृष्ण हरीच्या नामस्मरणात आणि टाळ मृदंगाच्या गजरात वारीच्या दिशेने निघालेला वारकरी परतीच्या प्रवासात प्रेमाचा चंदनसुगंध घेऊन येतो आणि सयंमाच आणि समृद्ध वैष्णवांच्या मेळाव्यातला अनुभव घेऊन पुन्हा आयुष्यांच्या वारीला सज्ज होतो..
अंजली रहाणे/थेटे
(कवयित्री लेखिका)
0
4
2
9
5
7



