0
4
2
9
5
7
१७ ऑगस्ट मदनलाल धिंग्रा यांची पुण्यतिथी
इंग्रजांच्या भुमित इंग्रज अधिकारी कर्झन वायलीची हत्या करणारे महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा.
मदनलाल धिंग्रा यांचा जन्म १८ सप्टेंबर १८८३ ला अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला व तेथूनच त्यांच्या हृदयात क्रांतीची मशाल धकधकायला लागली.इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो. मदनलाल धिंग्रा होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतीवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला होता.त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट रचला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या व त्यांची हत्या केली.कारण बंगालची फाळणी करण्यात कर्झन वायलीचा हात होता व भारतात ब्रिटिश सरकार व्दारे भारतीयांची अमानवी हत्या त्यांना पहावली नाही व अमानवी हत्यांचा बदला घेण्याच्या उद्देशाने इंग्लंडमध्ये म्हणजे त्यांच्या घरात घुसून कर्झन वायलीची हत्या केली व एक देशभक्त पूर्ण कृत्याच्या स्वरूपात विल्यस कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला यमलोक पोहचविले व विदेशात जाऊन ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणारा २० व्या शतकातील पहिला स्वतंत्र चळवळीतील क्रांतिकारक म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव मोठ्या स्वाभिमानाने घेतले जाते.या खुनाबद्दल मदनलाल धिंग्रा यांना अवघ्या महिन्याभरात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली व १७ ऑगस्ट १९०९ ला इंग्लंडच्या पेन्टोनव्हिल तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली व क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा ‘भारत माता की जय’च्या उद्घोषात हसत हसत फासावर गेले.अशा महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना कोटी कोटी प्रणाम.फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा म्हणले आहे “आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय”.१७ ऑगस्ट १९०९ हा दिवस कुणीही सच्चा देशभक्त कधीही विसरणार नाही. कारण याच दिवशी सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्याचा वध करणारे हुतात्मा मदनलाल दित्तमल धिंग्रा हसत हसत फासावर चढले.आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी थोर क्रांतीकारकारकांच्या पावलावर पाऊल ठेवून देशहित कार्य करण्याची गरज आहे. देशात वाढता भ्रष्टाचार यावर अंकुश अती आवश्यक आहे. कारण आज वाढता भ्रष्टाचार व राजकीय पुढाऱ्यांजवळ असलेली वाममार्गाने कमविलेली अमाप चल-अचल करोडोंची संपत्ती यामुळे देशात महागाई, बेरोजगारी,भुकमरी,कुपोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या इत्यादी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते.क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र करण्यासाठी आपले बलिदान दिले.परंतू आज आपण स्वतंत्र भारतात वावरतो आहे.त्यामुळे क्रांतिकारकांच्या बलिदानाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी घेऊन देशहिताचे कार्य केले पाहिजे व देशाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजांनी देशाला लुटले त्यापेक्षा हजार पटीने आजचा भ्रष्ट राजकीय पुढारी देशाला पोखरत आहे व देशाला खिळ-खिळा करीत आहे यावर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे क्रांतिकारकांची जोत नेहमी प्रज्वलित रहावी व आपल्या ह्रदयात त्यांच्या आठवणी निरंतर जीवीत राहाव्यात यासाठी आजच्या दिवशी सरकार, प्रशासकीय विभाग, स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था व शाळा -महाविद्यालय यांनी वृक्षलागवडीला प्राधान्य दिले पाहिजे.कारण या दिवशी लावलेल्या प्रत्येक झाडाच्या पानात,फुलात,फळात व जळामुळात आपल्याला संपूर्ण क्रांतिकारकांचे अवश्य दर्शन होईल.शहीद मदनलाल धिंग्रा ह्यांना कोटी-कोटी प्रणाम,जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
( स्वतंत्र पत्रकार )
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
0
4
2
9
5
7