वर्षभरात केला तब्बल १२ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक ग्रामीण पोलीसांची २०२४ सालातील कामगिरी
गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे. गतवर्षात सुरळीत पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांचा बिमोड करून, सराईत गुन्हेगार व समाज विघातक कृत्य करणाऱ्या इसमांवर परीणामकारक प्रतिबंधात्मक कारवाया करून कायदा व सुवस्था अबाधित ठेवलेली आहे.
दि.१जाने २०२४ ते ३१ डिसें २०२४ या कालावधीत नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसाय विरोधात एकूण ६८५२ धाडी टाकून ८११० इसमांविरुद्ध कारवाया करत एकूण १२ कोटी ०७ लाख ९९ हजार ८२९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणारे एकुण २७३ इसमांविरूध्द २०७ गुन्हे दाखल केले असून त्यात ५२ देशी बनावटीचे कट्टे, ११५ जिवंत काडतुसे, ११२ तलवारी, ३२ कोयते व ३५ चाकू हस्तगत करण्यात आले. जिल्ह्यातील खून व दरोड्याचे गुन्ह्यांना नाशिक ग्रामीण पोलीसांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. सन २०२४ मध्ये जिल्ह्यात एकूण ८७ खूनाचे गुन्हे नोंद झाले. यातील ८५ गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे. यावर्षी जिल्ह्यात दरोड्याचे १८ गुन्हे घडले असून हे सर्व १८ गुन्हे उघडकीस आणण्यात नाशिक ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे.
तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगार व समाजकंटकांविरूध्द विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यात एकुण ८६ गुन्हेगारांविरूध्द हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते, त्यापैकी सध्यास्थितीत एकुण १८ गुन्हेगार हद्दपार असुन उर्वरित आदेशाधीन आहेत. एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एकुण ०५ गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आलेले आहेत.