ब्रेकिंग
नशामुक्त युवक – विकसित भारत अभियानांतर्गत पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रम

0
4
8
2
6
0
नशामुक्त युवक – विकसित भारत अभियानांतर्गत पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रम
पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी) :- पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेतर्फे ‘नशामुक्त युवक-विकसित भारत’ अभियानांतर्गत शहरातील युवक, विद्यार्थी, पालक, महिला, शिक्षक तसेच नागरिकांमध्ये अमली पदार्थ व विविध प्रकारच्या व्यसनांविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध जनजागृतीपर व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अभियानाची सुरुवात दि. ३ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नशामुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाने करण्यात आली. दि. ४ ऑगस्ट रोजी शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधून अभियानाची माहिती देण्यात आली. तसेच मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व पोलीस यंत्रणेसोबत परिसंवाद आयोजित करून युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
दि. ५ ते १४ ऑगस्टदरम्यान शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये डॉक्टर, पोलीस अधिकारी व तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम, उपचार व समुपदेशन याबाबत व्याख्याने व मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी डॉ. धिरज भालेराव, डॉ. राहुल वाघ, डॉ. सुधीर गोन्हे तसेच सहायक पोलीस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभत आहे.
दि. ६ ऑगस्ट रोजी डॉ. राहुल वाघ यांनी पिंपळगाव हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना नशामुक्तीबाबत मार्गदर्शन केले. दि. ७ ऑगस्ट रोजी डॉ. धिरज भालेराव व डॉ. सुधीर गोन्हे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले.
दि. ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाच्या औचित्याने प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यसनांचे सामाजिक व कौटुंबिक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. दि. १० ऑगस्ट रोजी शिक्षण व कलाविष्कार दिनानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि. ११ ऑगस्ट रोजी चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारातून नशामुक्त समाजाचा संदेश दिला.
दि. १२ ऑगस्ट रोजी क. का. वाघ महाविद्यालय येथे प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सोननीस, नाशिक यांचे नशामुक्ती अभियानावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
दि. १३ ऑगस्ट रोजी महिला व कुटुंब जनजागृती दिन साजरा करण्यात येणार असून महिला बचत गटांच्या बैठका, कुटुंब संवाद व समुपदेशनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी कुटुंबाची भूमिका अधोरेखित करण्यात येणार आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी आरोग्य, उपचार व समुपदेशन दिन आयोजित करण्यात येणार असून आरोग्य तपासणी, समुपदेशन तसेच नशामुक्ती उपचार केंद्रांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
दि. १५ ऑगस्ट रोजी महासंकल्प व पारितोषिक वितरण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असून व्यसनमुक्त जीवनाचा स्वीकार करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व्यसनमुक्त व्यक्तींचा सत्कारही करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयांच्या आवारात नशामुक्तीविषयक पोस्टर्स, तक्रार पेट्या व समुपदेशन केंद्रे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध नशामुक्ती केंद्रे व स्वयंसेवी संस्थांची माहिती विद्यार्थ्यांना व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नशामुक्तीसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांची माहिती संकलित करून त्यांच्याशी समन्वय साधणे, आवश्यकतेनुसार नशामुक्ती उपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच डॉ. पंकज कोकाटे यांच्या होमिओपॅथी नशामुक्ती केंद्राच्या माध्यमातून उपचार व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अभियानातील व्याख्याने व जनजागृतीपर कार्यक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमातून प्रसारित करून व्यसनमुक्ती, उपचार व समुपदेशनाबाबत अधिकाधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येत आहे. युवकांना नशेच्या आहारी जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या संभाव्य समूहांवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे.
‘नशामुक्त युवक हीच विकसित भारताची ताकद’ या संकल्पनेतून पिंपळगाव बसवंत शहरातील युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कला, कौशल्य विकास व राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
या संपूर्ण अभियानात नगरपरिषद प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शाळा-महाविद्यालये, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा सक्रिय सहभाग असून नशामुक्त पिंपळगाव बसवंत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी केले आहे.
0
4
8
2
6
0


