विंचूरला भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप
विंचूर दि. १९(प्रतिनिधी) – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाला विंचूर करांच्या वतीने भक्तीमय वातावरणात व वाजतगाजत निरोप देण्यात आला.सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. मात्र लक्षवेधी ठरली ती येथील जय बजरंग मंडळाची मिरवणूक.जय बजरंग मंडळाने बॅंड, डि.जे.,बॅंजो, आदी वाद्यांना फाटा देऊन टाळ मृदंगाच्या गजरात सजविलेल्या रथातून व डोईवर तुलसी वृंदावन घेऊन पालखी सोहळ्यात गणरायाची दिंडी रूपात मिरवणूक काढली. मिरवणुकीत वडगांव येथील ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था ,चोंडी येथील श्रीदत्त गुरु ज्ञानपीठ वारकरी संस्था ,पंचतत्व वारकरी शिक्षण संस्थेच्या चिमुकल्या वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करुन वातावरण भक्तिमय केले होते. ह.भ.प जमदाडे महाराज येवला व ह.भ.प. सागर महाराज घुमरे सांगवी यांनी दिंडीचे नेतृत्व केले.तसेच मनमाड येथील राजाभाऊ भडके यांनी साकारलेला विठ्ठलाचा सजीव देखावा व देविसिंग परदेशी यांनी साकारलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा देखावा विंचूर करांचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत सहभागी महिलांनी फुगड्या खेळत मिरवणुकीचा आनंद लुटला. मिरवणुकीत सहभागी पुरुषांनी वारकरी सांप्रदायाचे प्रतिक असलेली पांढरी टोपी परिधान केलेली होती.’ मिरवणुकीत फलकांच्या माध्यमातून ”पृथ्वी करा जतन तीच आपली माता तीच आपलं वतन,, ”आनेवाली पिढी है प्यारी तो पृथ्वीको बचाना है हमारी जिम्मेदारी,, “झाडा सारखे जगा खूप मोठे व्हा…पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका ,, “थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग सुखी भविष्याचा,,दया नको संधी द्या.” दिव्यांगांना सामावून घ्या ,, ”स्वत: च्या बहिणीसाठी वाघ व्हा.पण दुसऱ्यांच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नका,, असे सामाजिक संदेश देण्यात आले. संपूर्ण सांप्रदायिक पद्धतीने मिरवणूक काढून जय बजरंग मंडळाने समाजा समोर आदर्श ठेवला आहे. तसेच शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित मिरवणुकीत दुर्गा मातेचे विविध रुपे व काली मातेचा राक्षसांचा संहार व खंडेराव महाराज म्हाळसा बानूचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता.तर मिरवणूकीत नऊवारी साड्या परिधान केलेल्या महिला महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत होत्या. तसेच भगवे वादळ गृपच्या वतीने मिरवणुकीत सादर केलेल्या बजरंग बलीचा देखावा व मर्दानी खेळ तसेच मोटू पतलूच्या बाल लिला पाहून बच्चे कंपनी खुश झाली.