Breaking
ब्रेकिंग

महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला : मंत्री छगन भुजबळ

0 4 2 9 5 7

*तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला; महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक*

*महात्मा फुले पुतळा विटंबना प्रकरण अमित शाहांकडे तातडीच्या कारवाईची मंत्री छगन भुजबळ यांची मागणी*

मुंबई,नाशिक,दि.८ फेब्रुवारी:- तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही अत्यंत निषेधार्ह, निंदनीय व समाजात असंतोष निर्माण करणारी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी तसेच विटंबना झालेल्या पुतळ्याच्या ठिकाणी नव्याने सन्मानपूर्वक पुतळा उभारावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर येथे सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे महान पुरस्कर्ते असलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर दिवसाढवळ्या झालेला हल्ला हा केवळ कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा प्रकार नसून सामाजिक समता, शिक्षण व मानवतावादी मूल्यांवरच थेट आघात करणारा आहे. या घटनेमुळे देशभरातील कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हटले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, महात्मा फुले यांनी सन १८४८ मध्ये देशात पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. त्यांनी क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून घडवले. समाजातील सती प्रथा, बालविवाह तसेच विधवांवर होणारे अत्याचार याविरोधात त्यांनी मोठा लढा उभारला. छुआछूत व जातीय भेदभावाला सामाजिक कलंक ठरवत त्यांनी शूद्र, अतिशूद्र, महिला, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांना संघटित करून सामाजिक क्रांतीचा मार्ग दाखविला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समतेवर आधारित समाजव्यवस्थेची मजबूत पायाभरणी त्यांनी केली. अशा महान समाजसुधारकाच्या पुतळ्याची विटंबना करणे म्हणजे समाजात द्वेष व अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असून हे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

समाजातील काही विघातक प्रवृत्ती आजही सामाजिक न्याय व समतेच्या विचारांना घाबरून अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व दोषींची तात्काळ ओळख पटवून त्यांना अटक करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. याशिवाय, विटंबना झालेल्या पुतळ्याच्या ठिकाणी लवकरात लवकर नव्याने भव्य व सन्मानपूर्वक पुतळा उभारण्यात यावा तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान समाज कधीही सहन करणार नाही. देशातील सामाजिक समता व संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी या घटनेत कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले असून केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सकारात्मक व तातडीची कार्यवाही होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे