आंदोलनकृषीवार्ताब्रेकिंग
चाळीसगाव बाजार समितीतील हमाल व तोलाई कामगारांचा बेमुदत संप !

0
3
2
1
2
3
यशवंतराव ताडगे/चाळीसगाव :- चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल व तोलाई कामगारांनी ३० टक्के लेव्हीसह सुधारित हमाली दर लागू करण्याच्या मागणीसाठी २२ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हमाल कामगार युनियनने यासंदर्भात सभापती व सचिवांना अधिकृत नोटीसही बजावली आहे.
या संपामुळे मुख्य बाजार समितीतील शेतीमालाच्या लिलावावर थेट परिणाम होणार आहे. बाजार समितीतील सुमारे २५० हमाल-तोलाई कामगार आणि ६४ व्यापारी, अडते, खरेदीदार कार्यरत आहेत. दर तीन वर्षांनी हमाल व तोलाई कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय असूनही, व्यापारी वर्गाने याला विरोध दर्शविल्याचा आरोप युनियनने केला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, २१ एप्रिल रोजी मुख्य बाजार आवारातील लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी जागेअभावी आणि आर्थिक अडचणीमुळे लिलावात सहभाग घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सभापती मच्छिंद्र राठोड यांनी सांगितले की, मुख्य बाजारातील भुसार मालाचे लिलाव पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आले असून, कांदा बाजार (नागद रोड) तसेच पिलखोड व मेहुणबारे येथील लिलाव मात्र सुरळीत सुरू राहतील. शेतकऱ्यांना चाळीसगाव मुख्य बाजार समितीत अन्नधान्य किंवा भुसार माल आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. हमाल-तोलाईदारांचा हा संप उग्र होण्याची शक्यता असून, युनियनने रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास बाजार समितीतील कामकाज अधिक काळ ठप्प राहू शकते.
0
3
2
1
2
3