बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे. तीन मैत्रिणींच्या मैत्रीचा प्रवास आणि त्यांच्या स्वप्नांची सफर दर्शवणारा हा कमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एकत्र आलेल्या या तीन मैत्रिणी कशा आपल्या आयुष्यातील संघर्षांना सामोरे जातात आणि मैत्रीतून जगण्याची एक वेगळी दिशा शोधतात, हे या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.
‘गुलाबी’ ही कथा फक्त मैत्रीची नसून, त्यांच्या वैयक्तिक संघर्षांची आणि आत्मसन्मानाच्या शोधाची गोष्ट आहे. या प्रवासात श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका मुख्य आहेत. तिघींच्या प्रवासाची रंगमय झलक ट्रेलरमध्ये दिसत असतानाच जयपूरमधील विविध रंगांचे आणि सौंदर्याचे दर्शनही घडत आहे.
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ” या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मैत्री, स्वप्न आणि स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकला आहे. गुलाबी केवळ स्त्रियांच्या भावविश्वाचा कहाणी नसून त्या आपला प्रवास कसा घडवतात, हेही या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या जीवनात असलेल्या गुलाबी रंगाची छटा दाखवली आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना एक सकारात्मक दृष्टिकोन देईल, याची मला खात्री आहे.”
अभ्यंग कुवळेकर यांनी दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाची निर्मिती सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संगीतकार साई-पियुष यांचे संगीत चित्रपटाच्या भावनांना आणखी उजळवते, ज्यामुळे ही कथा प्रेक्षकांना अधिक भावते.