आरोग्य व शिक्षण
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना यश

0
4
7
8
4
6
अत्याधुनिक ईएनटी व नेत्ररोग उपचारांमुळे रुग्णांना नवे आरोग्य, नवी दृष्टी; अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना यश
नाशिक : आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे नाक, कान, घसा (ENT) तसेच नेत्ररोगांच्या उपचारांमध्ये मोठी क्रांती झाली असून, अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर अत्यंत सुरक्षित, अचूक आणि प्रभावी उपचार करणे शक्य झाले आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ईएनटी आणि नेत्ररोग विभागात विविध यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येत असून, याबाबतची माहिती ईएनटी शल्यचिकित्सक डॉ. पंकज भट आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका भट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हॉस्पिटलतर्फे नागरिकांसाठी विशेष उपक्रमाची घोषणा करण्यात आली. नेत्ररोग विभागामध्ये प्रथमच येणाऱ्या रुग्णांसाठी नेत्ररोगतज्ज्ञांची (First Ophthalmology Consultation) पहिली तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली असून, डोळ्यांशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास किंवा नियमित नेत्रतपासणी करून घ्यायची असल्यास नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
आवाजातील बदलाकडे दुर्लक्ष करू नका – डॉ. पंकज भट
यावेळी बोलताना ईएनटी शल्यचिकित्सक डॉ. पंकज भट म्हणाले, “घसा बसणे, आवाजात सतत बदल होणे किंवा दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज खराब राहणे ही साधी समस्या समजून दुर्लक्ष करू नये. शिक्षक, गायक, कॉल सेंटर कर्मचारी, व्यावसायिक वक्ते तसेच सतत आवाजाचा वापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्वरयंत्रावर सतत ताण येत असल्यामुळे व्होकल कॉर्ड पॉलिप, नोड्युल्स किंवा इतर स्वरयंत्र विकार निर्माण होऊ शकतात. योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात.”
ते पुढे म्हणाले, “अलीकडेच आमच्याकडे ४४ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. अनेक दिवसांपासून त्यांना आवाज बसण्याचा आणि आवाजात बदल होण्याचा त्रास होत होता. अत्याधुनिक व्हिडिओ लॅरिंगोस्कोपीद्वारे तपासणी केली असता त्यांच्या उजव्या स्वरतंतूवर व्होकल कॉर्ड पॉलिप असल्याचे निदान झाले. त्यानंतर मायक्रो लॅरिंगोस्कोपी विथ व्होकल पॉलिप एक्सिशन ही सूक्ष्म शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आवाजात लक्षणीय सुधारणा झाली असून त्यांना तात्काळ आराम मिळाला आहे.”
“आज एंडोस्कोपिक तंत्रज्ञानामुळे अशा शस्त्रक्रिया अत्यंत अचूक आणि सुरक्षितपणे करता येतात. रुग्णाला मोठी जखम होत नाही, वेदना आणि रक्तस्त्राव कमी होतो तसेच रिकव्हरीचा कालावधीही कमी असतो. त्यामुळे रुग्ण लवकरच पूर्ववत दैनंदिन जीवन सुरू करू शकतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाजात बदल होत असल्यास तो केवळ सर्दी-खोकल्यामुळे आहे असे समजून दुर्लक्ष करू नये. वेळेत ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतात,” असे आवाहनही त्यांनी केले.
मोतीबिंदू आणि काचबिंदूवर आधुनिक उपचारांनी अंधत्व टाळणे शक्य – डॉ. प्रियंका भट
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका भट म्हणाल्या, “मोतीबिंदू आणि काचबिंदू हे अंधत्वास कारणीभूत ठरणारे दोन प्रमुख नेत्रविकार आहेत. मात्र योग्य वेळी निदान आणि आधुनिक उपचारपद्धतींच्या मदतीने बहुतांश रुग्णांमध्ये दृष्टी सुरक्षित ठेवणे शक्य आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आम्ही अत्याधुनिक फेकोइमल्सिफिकेशन (Phacoemulsification) आणि लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केवळ सुमारे २ मिलिमीटरच्या सूक्ष्म चिरातून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करतो. या शस्त्रक्रियेदरम्यान अत्याधुनिक इंट्राओक्युलर लेन्स (IOL) बसविल्यामुळे रुग्णांना जवळचे, मध्यम आणि दूरचे अशा तिन्ही अंतरांवरील स्पष्ट दृष्टी मिळते. अनेक रुग्णांचे चष्म्यावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होते, तर काही रुग्ण पूर्णपणे चष्मामुक्त जीवन जगू शकतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “काचबिंदू हा ‘सायलेंट व्हिजन थीफ’ म्हणून ओळखला जातो, कारण सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. हा आजार डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्हला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवू शकतो. त्यामुळे नियमित नेत्रतपासणी हा त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रौढ रुग्णांबरोबरच जुवेनाईल ग्लॉकोमा आणि सेकंडरी ग्लॉकोमा यांसारख्या दुर्मिळ प्रकारांवरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अगदी किशोरवयीन रुग्णांमध्येही वेळेवर निदान करून त्यांची दृष्टी सुरक्षित ठेवण्यात आम्हाला यश आले आहे.”
“वयाच्या ४० वर्षांनंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा नेत्रतपासणी करून घेणे आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कुटुंबात काचबिंदूचा इतिहास किंवा दृष्टी कमी होण्याची कोणतीही तक्रार असल्यास तपासणी पुढे ढकलू नये. डोळ्यांचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यांच्यावर प्रभावी उपचार करून अंधत्व टाळणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित नेत्रतपासणीची सवय लावावी आणि हॉस्पिटलतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रथम मोफत नेत्रतपासणी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की, “रुग्णांना महानगरांमध्ये न जाता नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे ध्येय आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, वेळेवर निदान आणि आधुनिक उपचारपद्धती यांवर आमचा विशेष भर असून, समाजातील प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आमचे आवाहन आहे.”
0
4
7
8
4
6



