Breaking
कृषीवार्ताब्रेकिंग

संकटावर मात करत बहुफसली प्रयोग; देवगाव फाटा येथील पगार बंधू ठरले आदर्श

0 4 2 9 5 7

संकटावर मात करत बहुफसली प्रयोग; देवगाव फाटा येथील पगार बंधू ठरले आदर्श

अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे नुकसान वांगी, टोमॅटो, कोबी, भोपळ्यांतून लाखोंचे उत्पन्न अपेक्षित

किरणकुमार आवारे…

शिरवाडे वाकद:- यावर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसून अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. वर्षभर जपावे लागणारे द्राक्ष पीक हातचे जाऊ लागल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, देवगाव फाटा येथील प्रयोगशील शेतकरी साहेबराव नारायण पगार व भाऊसाहेब नारायण पगार यांनी द्राक्ष बागेतच पर्यायी पिकांची लागवड करून संकटावर मात केली आहे. त्यांच्या या बहुफसली प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
दोन एकर एस.एस.एन द्राक्षे बागेत ऑक्टोबर छाटणीनंतर उत्पादन न आल्याने त्यांनी दि.१६ नोव्हेंबर रोजी एका एकरात गॅलन वांगी तर दुसऱ्या एकरात पंचगंगा वांग्याची लागवड केली. दोन महिन्यांनी गॅलन वांग्याचे उत्पादन सुरू झाले असून आगामी दोन महिने उत्पन्न मिळणार आहे. दिवसाआड सुमारे १०० क्रेट उत्पादन मिळत आहे. या वांग्याला प्रति क्रेट १८० ते २०० रुपये भाव मिळत आहे. एकरी सुमारे तीन हजार क्रेट उत्पादनाचा अंदाज आहे. यामधून सुमारे पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. पंचगंगा वांग्याला दोन महिन्यांत फळधारणा सुरू झाली असून १५ किलोच्या क्रेटला ३५० ते ४०० रुपये भाव मिळत आहे. दिवसाआड ५० क्रेट उत्पादन मिळत असून एकूण पंधराशे कॅरेट उत्पादनातून चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
द्राक्षे बागेच्या प्रति वेलीला एक असे ५ फूट अंतरावर एकरी ९०० वांगे रोपांची लागवड करण्यात आली. पाणी व खत व्यवस्थापनासाठी द्राक्षे बागेच्या ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. त्यामुळे द्राक्षे बाग व वांगे यांच्यासाठी एकत्रित पाणी व खत व्यवस्थापन झाल्याने उत्पादन खर्च कमी झाला. एकरी २५ हजार प्रमाणे दोन
एकरासाठी ५० हजार रुपये उत्पादन खर्च आला. बुलेट सिद्ध गोल्डन या दीड एकर द्राक्ष बागेत दि. ५ डिसेंबर रोजी विरांग या उन्हाळी जातीच्या वाणाची टोमॅटो लागवड केली आहे. योग्य नियोजन केल्याने टोमॅटो पिक बहरून आले आहे. साधारणतः तीन महिन्यांनी त्याचे उत्पादन सुरू होणार आहे. अशाप्रकारे द्राक्षे बागेत कमी कालावधीत उत्पन्न देणारी पिके घेऊन त्यांनी आर्थिक तोटा टाळला.
याशिवाय तोडलेल्या द्राक्षे बागेच्या लोखंडी खांब व तारेचा आधार घेऊन दि.१२ नोव्हेंबर
रोजी दिड एकरात वरद वाणाचे भोपळे लागवड केली आहे. सर्व पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी बचत व अचूक खत व्यवस्थापन साध्य झाले आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बहुफसली पद्धत अवलंबल्यास नुकसान टाळता येते, द्राक्ष बागेतील मोकळ्या जागेचा योग्य वापर करून कमी कालावधीत उत्पन्न देणारी भाजीपाला पिके घेतल्यास शेतकऱ्यांची आर्थिक जोखीम कमी होते आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतात हे या प्रयोगातून पगार बंधूंनी दाखवून दिले आहे.

@ द्राक्षाला माल आला नाही म्हणून हताश न होता पर्यायी पिकांचा विचार केला. पाणी, खत व कॅनोपी व्यवस्थापन केले. कमी कालावधीत उत्पन्न मिळावे हा उद्देश होता. योग्य नियोजन केल्यास कोणतेही संकट संधी बनू शकते.
– साहेबराव नारायण पगार शेतकरी

@ अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेती संकटात असताना बागेतील मोकळ्या जागेत भाजीपाला आंतरपीक घेतल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळून आर्थिक जोखीम कमी होऊ शकते. पगार बंधूंचा हा नवीन प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच आदर्श ठरेल.
– सुधाकर पवार,
तालुका कृषी अधिकारी, निफाड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे