
*नांदूरमध्यमेश्वर येथील राम मंदिराचे काम भव्य दिव्य करणार – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*
*नांदूर मध्यमेश्वर,दि.१२ फेब्रुवारी :-
* नांदूर मध्यमेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी उभारलेले अतिशय पुरातन असे पतीतपावन राम मंदिर आहे. या मंदिराच्या विकासासाठी २ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आले आहे. आगामी काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य दिव्य असे मंदिर उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
पतीतपावन श्रीराम मंदिर नांदूर मध्यमेश्वर येथे पर्यटन विकास २ कोटी रुपये निधीतून आज विविध विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भगवान श्रीरामाची पूजा करत मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भैय्याजी जोशी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच भैय्याजी जोशी यांनी देखील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान केला.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ,यतिन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, भालचंद्र जोशी,बाळासाहेब पुंड,विजय डांगळे, प्रमोद अनारसे, नवनाथ वैद्य, रंगनाथ अनारसे, मयूर अनारसे, बाळासाहेब गाजरे, शांताराम दातीर, भाऊसाहेब शिंदे, नंदू दातीर, रामदास शिंदे, पांडुरंग अनारसे, ज्ञानेश्वर अनारसे,पांडुरंग राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येवला विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांचा विकास आपण केलेला आहे. नांदूर मध्यमेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी अडीचशे वर्षांपूर्वी पतितपावन श्रीराम मंदिराची निर्मिती केली आहे. अतिशय पुरातन असलेल्या या मंदिरास मोठा इतिहास आहे. त्यानुसार या मंदिरामध्ये दोन कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करत अतिशय भव्यदिव्य असे श्रीरामाचे मंदिर उभारण्यात येणार असून यासाठी अजुन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.