Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !

0 4 4 8 0 1

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !

‘सावनी रेकॉर्डझ्’ या म्युझिक लेबलची घोषणा

‘मुजरा शिवबाला’हे पहिले गाणे प्रदर्शित 

मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे. तिच्या आवाजातील गोडवा, अभिव्यक्तीची ताकद आणि प्रत्येक गाण्यातून जाणवणारी भावना यामुळे सावनीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि आता हाच सुरेल प्रवास पुढे नेत ती स्वतःचं म्युझिक लेबल घेऊन सज्ज झाली आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ या नावाने तिने आपल्या म्युझिक लेबलची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात केली. मराठी संगीतविश्वातील दिग्गज गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते या म्युझिक लेबलचे लाँच करण्यात आले. यावेळी संगीत सृष्टीतील अवधूत गुप्ते, अभिजीत सावंत, कौशल इनामदार, अविनाश – विश्वजीत, नंदेश उमप, ऋषिकेश कामेरकर, मंगेश बोरगावकर, निहार शेंबेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे ही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे लेबल अंतर्गत तिचं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सावनी रवींद्रने ‘मुजरा शिवबाला’ हे पहिले गाणे सादर केले आहे. वैभव देशमुख यांच्या ओजस्वी शब्दांना विजय नारायण गवंडे यांचे दमदार संगीत लाभले असून सावनीच्या आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. या गाण्यात सावनी रवींद्रने गायनासह लावणीही सादर केली आहे. हे गाणे लावण्यवतींनाही खूप भावले व या निमित्ताने सर्व लावण्यवतींचा सन्मान करण्यात आला.

आजपर्यंत सावनीने संगीतामध्ये सातत्याने निरनिराळे प्रयोग केले आहेत. ‘सावनी ओरिजिनल्स’ या तिच्या यूट्यूबवरील सिरीजअंतर्गत तिने विविध भाषांमध्येही गायन केले आहे. चित्रपटांच्या गाण्यांबरोबरच ती तिच्या संगीतिक प्रयोगांसाठीही ओळखली जाते.

या नव्या उपक्रमाबद्दल सावनी म्हणते, ”सर्व अडचणींवर मात करत कुटुंब आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे. संगीत हेच माझं बळ आहे आणि त्याच बळावर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ हे केवळ म्युझिक लेबल नसून ते माझं स्वप्न आहे. एक असं व्यासपीठ जिथे दर्जेदार, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारे संगीत साकारेल. जिथे पोहोचण्याचा विचारही अनेकांसाठी धाडसी वाटतो, त्या वाटेवर चालण्याची हिंमत मी केली आहे. कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड ही मोठी पायरी मी चढते आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी अर्थातच या लेबलवर प्रदर्शित होतील त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित गायकांची व नवीन काही करू पाहाणाऱ्यांची गाणी प्रभावीपणे पोहोचवता येतील. पुढच्या काळात नव्या कलाकारांना संधी देत, संगीताच्या माध्यमातून काहीतरी वेगळं आणि अभिमानास्पद घडवण्याचा माझा प्रयत्न असेल.”

सुरेश वाडकर म्हणतात, “सावनीने तिच्या ‘मुजरा शिवबाला’ या गाण्यातून खरंच आपल्याला जुन्या काळात नेलं. पूर्वी ज्या ताकदीने आणि ठसक्यात लावण्या सादर केल्या जायच्या, तोच अनुभव या गाण्यातून मिळतो. सावनीने लावणीची परंपरा अत्यंत सुंदरपणे जपली आहे. गाण्याची चाल, शब्द आणि एकूणच सादरीकरण खूपच प्रभावी आहे. विशेष म्हणजे तिने स्वतः गायन करतानाच या गाण्यात उत्कृष्ट परफॉर्मन्सही दिला आहे, त्यामुळे स्क्रीनवर तिचं काम खूप सहज आणि उठून दिसतं. सावनीला संगीताचा उत्तम वारसा लाभला आहे. तिच्या या नव्या म्युझिक लेबलसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.”

‘सावनी रेकॉर्डझ्’चा लोगोही तितकाच अर्थपूर्ण आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या ओळखीचं प्रतीक असलेल्या ‘चंद्रकोर’ आणि व्हिनाइल रेकॉर्ड डिस्क यांचा सुंदर संगम या लोगोमध्ये पाहायला मिळतो. हा लोगो केवळ डिझाइन नसून जिंकण्याची वृत्ती, संगीताची परंपरा आणि भविष्यकालीन दर्जेदार कामाची हमी दर्शवतो. मराठी स्त्री गायिकांमध्ये स्वतःचे म्युझिक लेबल सुरू करून त्याअंतर्गत गाणी प्रदर्शित करण्याचं धाडस फार कमी जणी करताना दिसतात. अशा परिस्थितीत सावनी रवींद्रने घेतलेलं हे पाऊल अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 8 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे