खासगी बस २०० फूट दरीत कोसळली, ५ भाविकांचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
सापुतारा घाटातील घटना

भाऊसाहेब हुजबंद…
नाशिक….
त्र्यंबकेश्वर हुन निघालेली खाजगी ट्रॅव्हल्सची बस सापुतारा घाटात दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने या बसमधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना सापुतारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.
आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडलेला हा अपघात इतका भीषण होता की बसचे मोठ्या प्रमाणावर तुकडे झालेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की मध्य प्रदेशातील शिवपुरी, गुना आणि अशोक नगर जिल्ह्यातील भाविक 23 डिसेंबर रोजी देवदर्शनासाठी म्हणून धार्मिक स्थळांना भेटी देत असताना नाशिक जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील अनेक तीर्थस्थळांना भाविकांनी भेटी देऊन नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून गुजरात राज्यातील द्वारका येथे दर्शन घेण्यासाठी त्यांनी प्रस्थान केले होते. या दरम्यान नाशिकहून निघाल्यानंतर सापुतारा येथील घाटात असलेल्या एका दरीत ही बस अचानक 200 फूट खोल दरीत कोसळली या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, 15 जण अत्यंत गंभीर जखमी झालेले आहेत तर अन्य प्रवासी भाविक किरकोळ जखमी झालेले आहेत. या ट्रॅव्हलच्या बस मध्ये एकूण 48 प्रवासी असल्याचे सांगण्यात येते.
सदर अपघाताची माहिती मिळताच येथील ग्रामस्थ, पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. बसमधील मृत व्यक्ती जखमी व्यक्ती या सर्वांना बाहेर काढण्यात आले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे खालील प्रमाणे
भोलाराम कुशवाह ( राहणार रामगड शिवपुरी )
गुड्डी राजेश यादव (रा. रामगड शिवपुरी )
कमलेश वीरपाल यादव (रा. रामगड शिवपुरी )
बीजेंद्र उर्फ पप्पू यादव (रा. बीजरौनी, शिवपुरी )
यांसह बस चालक रतनलाल जाटव.