ब्रेकिंग
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता शासकीय अधिकारी प्रशासक

0
4
9
3
5
5
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता शासकीय अधिकारी प्रशासक ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार; निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा सहा महिन्यांपर्यंत नियुक्ती
किरण कुमार आवारे…
शिरवाडे वाकद:- राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे त्यांची निवडणूक घेता आलेली नाही, अशा ग्रामपंचायतींवर आता शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज मंगळवार, दि.८ सप्टेंबर रोजीनराजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १८२ च्या पोटकलम (१) तसेच कलम १५१ मधील तरतुदींनुसार राज्य शासनाने ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रासाठी प्रत्यायोजित केले आहेत. या अधिकारानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) किंवा अन्य कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करू शकतील. प्रशासकाची नियुक्ती राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत किंवा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे. दरम्यान, या विषयासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व आदेश अधिक्रमित करण्यात आल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या आणि निवडणुका घेता न आलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0
4
9
3
5
5


