सहा लाख रुपये चोरीच्या तपास प्रकरणी व्यापाऱ्यांचे पोलिसांना निवेदन
पोलिसांना निवेदन देऊन कांदा व धान्य लिलाव पूर्ववत
विंचूर येथील प्रभू श्रीराम चौक (तीन पाटी) येथे एका कांदा व्यापाऱ्याचे सहा लाख रुपयांचे बॅग हिसकावून मोटरसायकल वरून धूम ठोकली या घटनेचा तपास संथ गतीने सुरू असल्याच्या आरोपावरून येथील मार्केट कमिटीतील व्यापारी असोसिएशनच्या वतीने विंचुर पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात आले. तथापि कांदा व्यापाऱ्यांनी काही काळ कांदा लिलाव बंद ठेवले होते. त्यानंतर पोलिसांना निवेदन देऊन कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू केले.
याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक 1 जुन रोजी दुपारच्या वेळी राधे राधे ट्रेडर्स कंपनीचे मालक यांनी ॲक्सिस बँकेतून सहा लाख रुपये काढून ते शेतकऱ्यांना देण्यासाठी विंचूर मार्केट कमिटी कडे येत असताना येथील प्रभू श्रीराम चौक विंचुर पोलीस चौकी समोर मागून आलेल्या दोन मोटरसायकल स्वरांनी सहा लाख रुपये भरलेली बॅग हिसकावून सिनेस्टाईल धूम ठोकली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेला 48 तासाचा कालावधी उलटून गेला असून पोलीस तपास अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली असून याबाबतचे लेखी निवेदन लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना देण्यात आले आहे.