ब्रेकिंग
कोपरगाव येथील अपघातात विंचूरच्या तरुणाचा मृत्यू
0
4
2
9
5
7
कोपरगाव जवळ कार आणि खासगी बस अपघातात विंचूर येथील तरुणाचा भाजून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना काल रात्री घडली. असे समजते की, आपल्या बहिणीला आणण्यासाठी कार घेऊन नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथून कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे निघालेल्या तरुणाचा कार आणि खाजगी बसच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती जवळ 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

महामार्गावरून जात असताना कार आणि खाजगी बसची जोरदार धडक झाली. कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या भयंकर आगीत कार चालक जळून जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. मुजाहिद पप्पू शेख, वय अंदाजे 30 वर्ष, राहणार विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, असे अपघातात होरपळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खाजगी बस शिर्डीवरून इंदोरच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटाजवळ पोहोचली. समोरून येवल्याहून कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसचा पुढील भाग चक्काचूर झाला तर क्रेटाने पेट घेऊन जळून खाक झाली.
बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघात होताच प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला. घटनास्थळी कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अग्निशामक दल तातडीने दाखल झाले आणि दोन्ही पथकांनी संयुक्तपणे कारवरील आग विझवण्यात यश मिळवले. बसमधील प्रवाशांना स्थानिकांनी मदत केली मात्र क्रेटाने पेट घेतला असता गाडी सीएनजी आहे की काय? अशी चर्चा झाल्यानंतर गाडीजवळ कोणी गेलंच नाही.
दरम्यान अपघाताचे वृत्त समजतात विंचूर गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
0
4
2
9
5
7


