ग्रंथालयातील समृद्ध ग्रंथ संपदा वाचकांपर्यंत पोहचवावी : अशोक गाडेकर
शासकीय विभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
नाशिक, दिनांक 30 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : ग्रंथांमुळे मनुष्याच्या आचार- विचारांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतो. शासकीय विभागीय ग्रंथालयाची ही समृद्ध ग्रंथ संपदा वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रंथालयाने करावे, असे प्रतिपादन ग्रंथालय संचालनालय, मुंबई चे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.
सोमवार 29 जुलै 2024 रोजी शासकीय विभागीग ग्रंथालय येथे 50 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक नाशिक विभाग सचिन जोपुळे, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवेले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल जगताप, तांत्रिक सहाय्यक मिनल टेंभे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, व वाचक नागरीक उपस्थित होते.
श्री. गाडेकर यावेळी म्हणाले, ग्रंथालयाच्या 50 वर्षाच्या कालावधीत ग्रंथालयाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या तत्कालीन ग्रंथपालांच्या अभ्यासू वृत्ती व योगदानामुळे आज ग्रंथालयाची ग्रंथ संपदा अतिशय समृद्ध स्वरूपाची आहे. या ग्रंथालयामध्ये असलेली 96 हजाराहून अधिक अशी समृध्द ग्रंथ संपदा वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या परिसरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, बँका यांच्याशी संपर्क साधून त्यांना सभासद होण्यासाठी आवाहन करावे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शासकीय विभागीय ग्रंथालयाची ग्रंथालय सहलीचे आयोजित करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची माहिती होवून त्यांची वाचनाची भूक वाढेल असे विचार प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी यावेळी मांडले.
ग्रंथालय स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ग्रंथालयाकडून वाचक वाढवा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी, वाचक व नागरिकांनी वाचक
वाढवा अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले यावेळी केले. तसेच शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड येथील जवाहर मार्केट संकूलामध्ये पहिल्या मजल्यावर आयोजित हे ग्रंथ प्रदर्शन 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत ग्रंथप्रेमी, साहित्यिक, अभ्यागत, वाचक, संशोधकांसाठी खुले राहणार असल्याचेही श्री. येवले यांनी यावेळी सांगितले.
याप्रंसगी ग्रंथालयात नियमित येणाऱ्या वाचकांचा व ग्रंथालय सेवेची 25 वर्षे पूर्ण केलेले अधिकारी सु. अ. जगताप, सेवक सु. प्र. मोरे व सं. दा. गायकवाड यांचा ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तांत्रिक सहाय्यक मिनल टेंबे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप गवळी, नजराणा शेख, बापू शिवदे, किरण चौधरी, अमोल जोशी, राजेंद्र शिंदे, तुषार पाटलेरे, श्रीमती गुरुकुले व सुकदेव मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000000