Breaking
क्रिडा व मनोरंजन

दिग्दर्शक म्हणून गश्मीर महाजनीची दमदार सुरुवात!

0 4 8 5 2 0

अभिनेता गश्मीर महाजनी आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘राखणदार’ २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, घोषणेसोबतच चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. पोस्टरमधील रहस्यमय मांडणी, रक्तरंजित वातावरण आणि गूढ कॅप्शनमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर, गश्मीर महाजनी आणि मकरंद अनासपुरे ही दमदार स्टारकास्ट प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहे. चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाचे पहिले पोस्टरही तितकेच लक्षवेधी आहे. लालभडक पार्श्वभूमीवर रक्ताचे उडालेले शिंतोडे, मध्यभागी सिंहाच्या उग्र आणि डरकाळी फोडणाऱ्या चेहऱ्याची प्रतिमा, तर त्याखाली मजबूत देहयष्टी असलेली व्यक्तिरेखा दिसते. पोस्टरमधील सिंहाची प्रतिमा सामर्थ्य, धैर्य आणि रक्षणाची भावना अधोरेखित करते. ठळक अक्षरांमध्ये साकारलेले ‘राखणदार’ हे शीर्षक चित्रपटाच्या भव्यतेची आणि दमदार आशयाची स्पष्ट झलक देते. याच पोस्टरवर लहान मुलाच्या हस्ताक्षरात लिहिलेलं ‘माझा आवडता प्राणी – माझे बाबा’ हे कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहे. या एका वाक्यामुळे पोस्टरभोवतीचं गूढ आणखी वाढलं असून ही वडील- मुलाच्या नात्याची गोष्ट आहे का, पोस्टर इतकं रक्तरंजित का आहे, सिंहाचा चेहरा आणि माणसाचं शरीर यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

आपल्या नव्या वाटचालीबद्दल गश्मीर महाजनी म्हणाला, “दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारी असावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे या पोस्टरमधील प्रत्येक एलिमेंट अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे. पोस्टर पाहाताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात यावं, हा त्यामागचा उद्देश आहे. या पोस्टरमधील प्रत्येक प्रतिमा, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक तपशील कथेशी जोडलेला आहे. हा चित्रपट मी मनापासून माझ्या बाबांना समर्पित करत आहे.”

दिग्दर्शक म्हणून गश्मीर महाजनीचा हा नवा प्रवास, रहस्याने भरलेलं पहिलं पोस्टर यामुळे ‘राखणदार’ आतापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. २०२७ मध्ये हा चित्रपट नेमकी कोणती कथा आणि कोणता वेगळा अनुभव घेऊन येणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे