ध्वज लावत असतांना ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू , तीन जण गंभीर
मनमाड जवळील घटना

मुक्ताराम बागुल…
नांदगाव तालुक्यातील मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदिच्या (लाईट) फोनवर हायड्रॉ (क्रेन) द्वारे शिवजयंती उत्सव निमित्ताने झेंडे लावत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम विचार करून मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. जखमी आणि मयतांची नावे अद्याप समजली नसून पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी 19 तारखेला होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने सर्वत्र भगवे ध्वज लावण्याचे काम सुरू आहे. मनमाड शहरातील मनमाड-नांदगाव महामार्गावरील हॉटेल सह्याद्री समोर या महामार्गावरील पथदीप पोलवर क्रेनद्वारे भगवे झेंडे लावत असताना समोरून आलेल्या ट्रकने या क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात इतका भीषण होता की क्रेनचा अक्षरशः चुरा झाला आहे. रात्रीचा अंधार असल्याने मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती.
ट्रक चालकाला समोरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले व जखमींना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर तीन गंभीर जखमींना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.