गुन्हेगारीब्रेकिंग
ध्वनीप्रदूषण केल्यास कठोर कारवाई – सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे
लाऊडस्पीकर, डीजे किंवा ध्वनीप्रदूषण कायद्याने प्रतिबंधित आहे

0
4
2
9
5
7
ध्वनीप्रदूषणाबाबत पोलिसांचे आवाहन; रात्री १० नंतर कारवाईचा इशारा
किरण कुमार आवारे…शिरवाडे वाकद :-
दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असताना काही ठिकाणी सुरू असलेल्या लाऊडस्पीकर, डीजे व मोठ्या आवाजातील संगीतामुळे विद्यार्थ्यांसह आजारी, वृद्ध व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रात्री १० नंतर ध्वनीप्रदूषण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिला आहे.
सध्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा जवळ आल्याने अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी धार्मिक सप्ताह, लग्नसमारंभ आदी कारणांसाठी पहाटे तसेच रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर, डीजे व मोठ्या आवाजातील संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसह आजारी व्यक्ती, वृद्ध नागरिक व लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव ठाणे प्रभारी भास्करराव शिंदे यांनी
परीक्षाकाळात सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले आहे. रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज, लाऊडस्पीकर, डीजे किंवा ध्वनीप्रदूषण कायद्याने प्रतिबंधित आहे. रात्री १० नंतर ध्वनीप्रदूषण आढळल्यास आयोजक व डीजे मालकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
0
4
2
9
5
7

