पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
: जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पूर्वसूचना
नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यातील डोंगर, धबधबे, गडकिल्ले, घाट, धरण, तलाव अशा परिसरात पावसाच्या दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी गर्दी सोबतच संभाव्य अपघातांच्या घटना टाळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा पूर्वसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांची नुकतीच बैठक घेण्यात आली.
असे करावे नियोजन/ उपाययोजना….
* वन विभाग/पाटबंधारे विभाग यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणांची पर्यटकांच्या गर्दीनुसार अ, ब व क अशा तीन प्रकारात वर्गवारी करावी. पर्यटन स्थळांवर, गड-किल्ल्यांवर, धरण / तलाव, धबधबे आदि ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची नोंद घेण्यात येऊन, सर्व जण सुरक्षित बाहेर पडल्याबाबतची खात्री करावी.
* “अ” दर्जाच्या ठिकाणी लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अशा ठिकाणांची धारण क्षमता निर्धारीत करून यासाठी अनूभवी दुर्ग व पर्यावरण अभ्यासकांची मदत घ्यावी. तसेच या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांकडून माहिती मागवून त्यांच्या अनुभवाचा देखील वापर करून विशिष्ट पर्यटन स्थळी किती गर्दी सामावू शकते याची माहिती मिळून त्या प्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात.
* गर्दीच्या ठिकाणची गर्दी धारण क्षमतेनुसार नियंत्रण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पर्यटक परवाना देण्यात यावा. प्रथम येईल त्यास प्राधान्य (First Come, First Serve) या तत्वावर हे पर्यटक परवाने देण्यात यावेत.
* पोलिस विभागाद्वारे सुट्टीच्या दिवशी अशा ठिकाणांवर विशेष करून येण्या-जाण्याच्या मार्गावर, मोक्याच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावा.
* पोलिस, वनविभाग व पाटबंधारे विभाग यांनी आपल्या हद्दीत पोहणारे, सर्प मित्र, स्वयंसेवक, तसेच आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचाव कार्यासाठी मदत करणाऱ्यांची यादी तयार करून, त्यांची बैठक घेवून गरजेनुसार त्यांची मदत घेण्यात यावी. तसेच त्यांच्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये निवारणाच्या दृष्टीने प्रशिक्षण / शिबीर आयोजित करावे, तसेच मदत व बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे.
* वन विभागाने ज्या ठिकाणी वन पर्यटनाची सुविधा निर्माण केली आहे, त्याची माहिती उपलब्ध करून द्यावी. तसेच अशा ठिकाणी आवश्यकता असल्यास प्रशिक्षित लोकांच्या मदतीनेच पर्यटकांना आत सोडावे.
* वनक्षेत्र, गड-किल्ले, धरण परिसर अशा ठिकाणी नागरिकांनी शिस्त पाळणे, वनांचे नुकसान टाळणे, झाडे झुडपे तोडू नये तसेच अवघड ठिकाणी सुरक्षेची काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी सेल्फी, छायाचित्रे काढू नये याबाबतची माहिती सूचना फलकांच्या माध्यमातून आपत्कालिन संपर्क क्रमांकासह प्रसारित करावी. यासोबतच सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, अपघात टाळण्यासाठी हवामानातील बदलाच्या अंदाजाबाबत नागरिकांना सूचित करावे.
00000