ब्रेकिंग
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात आज दिवसभर भूकंपाचे वारंवार धक्के; नागरिक भयभीत, प्रशासन सतर्क

0
4
8
0
8
0
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात आज दिवसभर भूकंपाचे वारंवार धक्के; नागरिक भयभीत, प्रशासन सतर्क
लक्ष्मण पवार, हतगड :
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, हतगड, सराड, घागबारी, हरणटेकडी, रोटी, वाझुळपाडा, शिंदे दिगर तसेच परिसरातील गावांमध्ये गुरुवारी (६ ऑगस्ट) दिवसभरात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असताना आज एकाच दिवशी अनेक वेळा धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण अधिक गडद झाले आहे.
सुरगाणा तालुक्यात आज सकाळी 5:41 वाजता 3.0 रिश्टर, 7:09 वाजता 3.0 रिश्टर, 8:58 वाजता 2.7 रिश्टर, दुपारी 2:56 वाजता 2.8 रिश्टर आणि 3:38 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप नोंदविण्यात आले. यातील 3.6 रिश्टर स्केलचा धक्का हा दिवसातील सर्वाधिक तीव्र होता. वारंवार धक्के बसत असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी एकमेकांना दूरध्वनी करून सुरक्षिततेची विचारपूस केली, तर काही गावांमध्ये नागरिक बराच वेळ घराबाहेरच थांबून होते.विशेष म्हणजे, यापूर्वीही बोरगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे आज पुन्हा वारंवार धक्के बसल्यानंतर नागरिकांच्या मनातील भीती आणखी वाढली आहे. “सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने रात्री झोप लागत नाही. पुन्हा मोठा भूकंप होईल का, अशी भीती वाटत आहे,” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आजच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नसली तरी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
4
8
0
8
0


