ब्रेकिंग
आदिवासी सरपंच – पत्रकाराला शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी!

0
5
1
7
3
0
पीक पंचनाम्याची बातमी न लावल्याचा राग; ॲट्रॉसिटीसह पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा ; पत्रकार संघांचा आंदोलनाचा इशारा
किरणकुमार आवारे :- पीक पंचनाम्याची बातमी प्रसिद्ध न केल्याच्या कारणावरून आदिवासी समाजातील लोकनियुक्त सरपंच तथा पत्रकाराला फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना देवळा तालुक्यात घडली. या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१(२), ३५१(३), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(आर) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम, २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच तथा ‘प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज’चे देवळा तालुका विभागीय संपादक वैभव धर्मा पवार हे हे मागील सुमारे दहा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून देवळा तालुक्यात त्यांचा नागरिकांशी संपर्क आहे.
दिनांक २४ सप्टेंबर रोजी विलास आढाव यांनी पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्या शेतातील पिकांच्या पंचनाम्याबाबत सांगितले होते. पंचनामा झाला नाही तर तहसील कार्यालयात जाऊन टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा केल्याने पवार यांनी कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन करून प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आढाव यांनी पवार यांना फोन केला. ‘माझी बातमी का लावली नाही?’ असे विचारत अपमानास्पद भाषा वापरली. मात्र पवार यांनी संयम राखत, तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याने लवकरच पंचनामे होतील, असे त्याला समजावून सांगितले. मात्र, तरीही संबंधित व्यक्तीने पवार यांना त्यांच्या गावात येण्याची भाषा करत धमकीवजा वक्तव्ये केली, तसेच पुन्हा बातमी प्रसिद्ध न केल्यास प्रसारमाध्यमाबाबत घाणेरड्या भाषेत बोलून धमकी दिली. याच फोनवरील संभाषणानंतर पवार हे खामखेडा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या परिचितांसोबत बसले असताना त्यांनी संबंधित व्यक्तीशी पुन्हा फोनवरून संपर्क साधला. हा फोन लाऊडस्पीकरवर असल्याने तेथील व्यक्तींनीही संभाषण ऐकले, त्यामुळे पवार यांची मानहानी झाली. या संभाषणादरम्यान संबंधित व्यक्तीने पवार यांना त्यांच्या जातीचा उल्लेख करून अर्वाच्च व अपमानास्पद शिवीगाळ केली तसेच मारहाणीची व जीवे मारण्याची धमकी दिली. पत्रकार म्हणून काम करत असल्यामुळे आणि बातमी प्रसिद्ध न केल्याच्या कारणावरून आपला अपमान करण्यात आल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेतील फोन संभाषण, संबंधित साक्षीदार आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.
या घटनेने पत्रकारिता, लोकप्रतिनिधींचा सन्मान आणि आदिवासी समाजाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक ब्रह्मदेव सखाराम शेळके करीत आहेत.
* वैभव पवार हे अत्यंत सुस्वभावी पत्रकार असून केवळ बातमी न आल्याचे कारण देत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणे ही बाब गंभीर आहे. सदर व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा जिल्हाभरातील पत्रकार तीव्र आंदोलन छेडतील.
आण्णापाटील बोरगुडे
जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ
0
5
1
7
3
0


