0
4
2
9
5
7
आदीशक्ती स्वरुप करुणामयी प्रा.सीमा सोनवने ( भांङारकर)
सागर निकाळे निफाङ प्रतिनिधी-
आज तो दिवस मला आठवतो. मी कला व वाणिज्य महाविद्यालय, वणी या महाविद्यालयात इयत्ता अकरावीला प्रवेश घेतला. माझी आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे मी बिगर चपलेचा कॉलेजला जायचो. त्या वेळी आमच्या वर्गाला इंग्रजी शिकवण्यासाठी प्रा. श्रीमती सीमा सोनवणे मॅडम ( भांडारकर मॅडम ) यायच्या. त्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. मी बिगर चपलेचा कॉलेजला यायचो. ते त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला चपलेच्या दुकानात जाऊन नवीन चप्पल घेऊन दिली. तो काळ १९९६ चा होता. त्यावेळी त्यांनी मला एक मंत्र सांगीतला होता. तो मी आज तुम्हाला सांगतो. तुम्ही सुद्धा दुसर्यांना सांगा. “अरे अशोक, माणूस जन्माने जरी गरीब असला पण तो कर्माने मोठा होतो. तू चांगला अभ्यास कर !!” मी खूप विचार केला आणि अभ्यासाला लागलो.
१९९७ या वर्षी मार्च मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा होती आणि नशीब बघा, मला त्या दरम्यान टायफॉइड झाला. ताप आला. मी बोर्डाचे पेपर्स द्यायलाच नकार दिला. कारण स्पष्ट होते. मी नापास होणार. परंतू हे जेव्हा प्रा. श्रीमती सोनवणे मॅडम यांना कळले तेव्हा त्यांनी मला सांगितले, “अशोक नापास झालास तर काय बिघडणार आहे? तुला परीक्षेचा अनुभव तर येईल! नंतर परत परीक्षा देऊन पास हो आणि हे पेपर्स तर दे. मी त्या तापातच सर्व पेपर्स दिले. पण त्यावेळेस दवाखान्यात प्रा. सोनवणे मॅडम ( भांडारकर मॅडम ) व भांडारकर सर दोघं मला भेटायला दवाखान्यात आले. माझी तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून त्यांनी मला पौष्टिक खुराक सुरु केला. सर्व पेपर्स दिले व मी घरी गावाला गेलो. निकाल लागला. मला बारावीला ६५.८३% मार्क्स मिळाले. मी पास झालो. अशक्य गोष्ट प्रा. सोनवणे मॅडम यांच्या कृपेने शक्य झाली. नंतर १९९८ ते २००० या वर्षी मी डी. एड. कॉलेज पूर्ण केले. तेव्हाही मॅडमने मला खूप धीर दिला. तन मन धनाने सहयोग करीत राहील्या आणि मी १४|०१|२००० रोजी मी शिक्षक झालो..!! आई, वडील, भाऊ, बहीण यांना खूप आनंद झाला. आज मी माझ्या सेवेची २५ वर्षे पूर्ण केली आणि आज माझ्याजवळ सर्व वैभव आहे. मॅडम तुमच्या मंत्रामुळे, साधनेद्वारे मी आज कर्माने खरोखर उंची गाठली आहे.
तुमच्या आध्यात्मिक सहवासाने तुमचा अशोक अरहंत अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. थोड्या जन्मात तो अरहंत होईल. कारण “गुरु” म्हणून मला तुम्ही लाभलाय मॅडम. सदगुरुचे उपकार, आईचे उपकार, वडिलांचे उपकार हे मी कधीच फेडू शकत नाही. तुम्ही माझे सदगुरु झालात आणि सगळे जीवनच बदलून गेले. मॅडम मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला “आदिशक्ती” म्हणून मानत आलो. आजही तुम्ही “आदिशक्ती” आहात हे आज माझ्या सारख्या भक्ताच्या रुपाने सिद्ध करुन दाखवले. आज माझ्याकडे आध्यात्मिक विषयाचा खूप मोठा अभ्यास आहे, हे माझ्या कार्यातून समाज बघतो आहे. हा माझा मोठेपणा नाही तर हा प्रा. श्रीमती सीमा सोनवणे मॅडम यांच्या रुपाने “आदिशक्तीचा आशीर्वाद” सोबत आहे.
आज त्या स्वेच्छा निवृत्ती आध्यात्मिक सेवा प्रचंड करण्यासाठी घेत आहेत. त्यांची सेवा, त्यांची साधना अखंड आहे. त्यांना पुढील आयुष्य सुखा समाधानाचे व आरोग्यमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना अनंत आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
ॐ गुरुदेव
आपला दास – अशोक खोटरे ( शिक्षक)
0
4
2
9
5
7



