महाराष्ट्र बँकेकडून लासलगांव पोलिसांवर कौतुकाची थाप

महाराष्ट्र बँकेकडून लासलगांव पोलिसांवर कौतुकाची थाप
मागील आठवड्यात एटीएम फोडणाऱ्या चोरांना लासलगाव पोलिसांनी फोडला घाम
शरद लोहकरे, लासलगाव – लासलगाव पोलिसांनी जीव धोक्यात घालून बँक ऑफ महाराष्ट्रच्या ए.टी.एम ची चोरी रोखत लाखो रुपये वाचविल्याने बँकेच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
दि.२९ रोजी पहाटे २.२५ च्या सुमारास लासलगावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे ए.टी.एम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला असता सुरक्षा बजर वाजल्याने बँकेने याबाबत लासलगाव पोलिसांना कळवले. यावेळी ठाण्यात उपस्थित पो.ना.किशोर लासुरकर व पो.शि.अमोल तळेकर यांनी जीव धोक्यात घालून मोटार सायकल वरून ए.टी.एम गाठले. यावेळी काही वेळातच स.पो.नि.भास्कर शिंदे व पो.ऊ.नि.आप्पासाहेब हांडाळ तातडीने पोलीस गाडी व ताफ्यासह हजर झाले. पो.ऊ.नि. हांडाळ, पो.हवा.बाबासाहेब कांदळकर, पो.हवा.लासुरकर, पो.शिपाई तळेकर, चालक मांजरे यांनी विंचुरच्या दिशेने आरोपींचा पाठलाग सुरु केला. पोलिसांना पाहताच भगरी बाबा मंदिरासमोरील येस व एच.डी.एफ.सी बँकेचे एटीएम फोडण्यात मग्न असणाऱ्या आरोपींनी विदेशी बनावटीच्या गाडीतून पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गाडी आडवी लावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चक्क दोन चाके दुभाजकावर घालून गाडी पळवली. विदेशी बनावटीची गाडी व तिच्या प्रचंड वेगामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र तिन्ही ए.टी.एम मधील लाखो रुपये वाचविण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांच्या या अभिनंदनीय कामगिरीमुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पोलिसांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँक व्यवस्थापक मधुकर बावस्कर, उपव्यवस्थापक किसन सानप, कैलास धाकराव, मयूर काकड, स.पो.नि.भास्करराव शिंदे, पो.उ.नि.आप्पासाहेब हांडाळ, पो.हवा.बाबासाहेब कांदळकर, पो.हवा.लासुरकर, पो.पा.वैशाली राजोळे, पो.शिपाई तळेकर, चालक मांजरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
◆ आमच्या बँक शाखेत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत बँकेची पॉलिसी नाही. त्यामुळे बँकेचे ए.टी.एम.संपूर्णपणे पोलिसांच्या भरवशावर आहे. त्यामुळे सुरक्षा बजर वाजताच पोलिसांनी तातडीने हजर होऊन आमच्या बँकेच्या ए.टी.एम मधील ८ लाख रुपये वाचवले त्यामुळे त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन म्हणून बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मधुकर बावस्कर, बँक व्यवस्थापक