Breaking
ब्रेकिंग

लासलगावात एकाच रात्री चोरट्यांचा धुमाकूळ; मंदिर, मोबाईल दुकान, बँक आणि मोटारसायकल लक्ष्य

0 4 7 8 7 9

लासलगावात एकाच रात्री चोरट्यांचा धुमाकूळ; मंदिर, मोबाईल दुकान, बँक आणि मोटारसायकल लक्ष्य

दिगंबर जैन मंदिरातून लाखोंचा ऐवज लंपास; मोबाईल दुकान फोडले, पंजाब नॅशनल बँकेत चोरीचा प्रयत्न, गुरुसावली परिसरातून दुचाकी चोरी

शिरवाडे वाकद :- लासलगाव शहरात चोरट्यांनी एकाच रात्री विविध भागांत धुमाकूळ घालत पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दिगंबर जैन मंदिर, सह्याद्री चौकातील मोबाईल दुकान, पंजाब नॅशनल बँकेची स्ट्रॉंग रूम आणि गुरुसावली परिसरातील दुचाकी अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी चोरी अथवा चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


आज मंगळवार दि.३० जून पहाटे सुमारे दोन वाजेच्या सुमारास सर्वे क्रमांक ९३ मधील दिगंबर जैन मंदिराच्या बाजूची सिमेंटची खिडकी फोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील पद्मावती मातेची सोन्याची पोत, चांदीचे सिंहासन, चांदीचे पंचमेरू, छत्र तसेच दानपेटीतील रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. सकाळी सात वाजता राजू दगडे हे नियमित अभिषेकासाठी मंदिरात आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर चोरट्यांनी सह्याद्री चौकातील अभिषेक खुटे यांच्या ‘जय बाबाजी मोबाईल शॉप’चे कुलूप तोडून दुकानात दुरुस्तीसाठी ठेवलेले ग्राहकांचे १६ मोबाईल आणि गल्ल्यातील रोकड लंपास केली. चोरट्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्रॉंग रूम विभागालाही लक्ष्य केले. बनावट चावीच्या साहाय्याने लॉकर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो अयशस्वी ठरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, शहरातील गुरुसावली परिसरात राहणारे ज्ञानेश्वर कुमावत यांच्या घराबाहेर उभी असलेली मोटारसायकलही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. एकाच रात्री चार ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून शहरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक किरण साळुंखे, पोलीस कर्मचारी गोसावी, सांगळे व अन्य पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये तीन संशयित चोरटे कैद झाल्याची माहिती आहे. त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
गेल्या काही महिन्यांत दत्त मंदिर, विठ्ठल – रुक्मिणी मंदिर, गणेश मंदिर आणि दुर्गा मंदिर अशा अनेक धार्मिक स्थळांवर चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता बँक आणि निवासी भागही चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, संवेदनशील भागांत अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी व्यापारी, भाविक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 8 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे