Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगराजकियसामाजिक

कोटमगाव येथील उपसरपंचांवर ॲट्रोसिटी दाखल

0 3 2 1 2 3

लासलगाव (प्रतिनिधी)…

कोटमगाव ता.निफाड येथील पोलीस पाटील सचिन अहिरे यांनी उपसरपंच योगेश पवार यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीस पाटील सचिन शिवाजी आहिरे, वय ३५ वर्ष, यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, मी दि.१७ जाने.२०२४ पासून पोलीस पाटील म्हणून काम पाहत आहे. गावातील उपसरपंच योगेश बाळासाहेब पवार हे मला जूलै २०२४ पासून, ‘तू खालच्या जातीतील पोलीस पाटील असल्यामुळे, तुला पोलीस पाटील होण्याचा अधिकार नाही. आम्हीच खरे पाटील आहोत’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून, ‘तु आम्हाला विचारल्याशिवाय कोणतीही खबर पोलीस स्टेशनला द्यायची नाही. गावात काही घटना घडल्यास ती आम्ही बघुन घेऊ’ अशी धमकी देत आहे. मात्र दबावाला न जुमानता मी माझे कर्तव्य शासन नियमानुसार पार पाडत राहिलो असता, सदर इसमाने मला धमकावयाला सुरुवात केली. ‘आता तुझे पद घालविण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करेल. पण तुला घरीच बसवितो’ असे म्हणत त्या अनुषंगाने त्याने मला वेळोवेळी त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तु उपऱ्या आहेस, गावात तुम्ही बाहेरून आले आहात, पोलीस पाटील होण्याची तुझी लायकी नाही, तुझ्यावर सामाजिक बहिष्कार टाकु, तु पदाचा राजीनामा दे नाहीतर तुझे जगणे मुश्किल करेल, तू खालच्या जातीतील आहेस, तुझ्या सारख्याला पोलीस पाटील म्हणणे म्हणजे आमची तळपायाची आग मस्तकात जाते’ असे म्हणत त्याने माझे घरच्यांना पण धमकाविण्यास सुरुवात केली. हा माणूस मला नीच दर्जाची वागणूक देतो. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या वेळेस ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच यांचेसोबत नुकसानीची पाहणी करण्यासाठी जात असताना पवार याने माझेजवळ येवून मला धमकाविले की, ‘तु जर कोणाचे बांधावर दिसला तर, तुझे हातपाय तोडील’ अशी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याचा दम दिला. गावातील गुन्हेगारी वृत्तीच्या महिला व पुरुष यांना फूस लावून माझे विरुध्द खोटे तक्रार अर्ज बनवुन खोट्या सह्या घेवून अर्ज मागवुन ग्रामसभा बोलवली. त्यानंतरही माझे घरी येवून मला शिवीगाळ केली. त्या संदर्भात लासलगाव पोलीस ठाण्यात दोनदा तक्रार दाखल केली आहे. त्यावरून त्यास कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावून देखील सदर इसमाने कोणत्याही गोष्टीला न जुमानता माझेवर अन्याय अत्याचार चालूच ठेवले. त्यामुळे माझ्या व माझे कुटुंबियांचे जीवाला पवार याचेपासून धोका आहे. गावात काही पोलिसी कारवाई झाल्यास माझ्यामुळे हे प्रकार झाले आहेत असा लोकांत गैरसमज पसरवतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवून माझे कायदेशीर अधिकारांवर बंधने आणले आहे.
माझे प्रतिष्ठेला धोका पोहचेल असे वारंवार कृत्य करून मी पोलीस पाटील झाल्यापासुन शत्रुत्वाची भावना तसेच माझेविरुध्द द्वेष व्यक्त करत आहेत. मला माझे घर व गाव सोडण्यास भाग पाडत आहे असे म्हटले आहे. त्यांचे फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात उपसरपंच योगेश पवार यांचे विरोधात भा.न्या.संहिता २०२३ चे ३५२, ३५१(३)(२), अनु.जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे ३(१)(चे) ३(१)(आर) ३(१)(मी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पालवे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे