ब्रेकिंग
लासलगाव पोलिसांची धडक कारवाई: २ किलोमीटर धावत पाठलाग करून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या!

0
4
7
7
9
1
लासलगाव पोलिसांची धडक कारवाई: २ किलोमीटर धावत पाठलाग करून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या!
किरण कुमार आवारे, शिरवाडे वाकद
लासलगाव येथील विद्या नगर भागात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात लासलगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या या अट्टल गुन्हेगाराचा पोलिसांनी तब्बल २ किलोमीटरपर्यंत धावत पाठलाग करून मुसक्या आवळल्या. भाऊराव रघुनाथ पवार (रा. सावरगाव, ता. येवला) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ३१ मार्च २०२६ रोजी लासलगाव येथील विद्या नगर परिसरात चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. ९६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करत होते.
या गुन्ह्यातील एक आरोपी आधीच लासलगाव पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार भाऊराव रघुनाथ पवार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर आरोपी हा येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर ४ गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना सदर आरोपीबाबत गुप्त माहिती मिळताच, त्यांनी तातडीने एक विशेष तपास पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. पोलीस पथक आरोपीचा शोध घेत त्याचे मूळ गाव सावरगाव येथे पोहोचले. पोलिसांची गाडी पाहताच आरोपी भाऊराव पवार याने पळ काढला. यावेळी लासलगाव पोलिसांच्या पथकाने तब्बल २ किलोमीटरपर्यंत धावत पाठलाग करून अखेर आरोपीला घेराव घालून ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस अंमलदार अविनाश सांगळे, संदिप डबळे आणि चालक पोलीस अंमलदार चंदू मांजरे यांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली. लासलगाव पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे.
0
4
7
7
9
1



