Breaking
ब्रेकिंग

विंचूर च्या महिलांना फसवणारे बोराळे दाम्पत्य जेरबंद

लासलगाव सिन्नर घोटी येथे गुन्हे दाखल होते

0 5 1 7 3 0

किरण कुमार आवारे…

लासलगाव पोलिसांची कारवाई; कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील दोन फरार आरोपी सोलापुरातून जेरबंद ; सात दिवसांची पोलिस कोठडी

शिरवाडे वाकद :- आर्थिक फसवणूक व अपहाराच्या प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना लासलगाव पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सोलापूर परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. संजय अभिमान बोराळे (वय ४२) व जयश्री संजय बोराळे (वय ३५) दोघे रा.सोहम सिटी, लासलगाव, ता. निफाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    लासलगाव पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४), ३(५), ६१(२) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायदा कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार महिलांची सुमारे १ कोटी ३९ लाख ५९ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक/अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

   या आरोपींविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ४००/२०२६ अन्वये दाखल गुन्ह्यात सुमारे ७३ लाख रुपये, तर घोटी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २०१/२०२६ अन्वये दाखल गुन्ह्यात सुमारे २० लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे.

  गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.

      गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असल्याने तपास पथकाने तांत्रिक माहिती, मोबाईल विश्लेषण, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच प्रत्यक्ष शोधमोहीम यांच्या माध्यमातून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सोलापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपास पथक रवाना करण्यात आले.

     सलग तपास व शोधमोहीम राबविल्यानंतर पथकाने संजय बोराळे व जयश्री बोराळे यांना ताब्यात घेतले. त्यांना लासलगाव पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस शिपाई संदिप डगळे, गणेश नागरे तसेच लासलगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी

विंचूर येथील ‘दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्था’च्या माध्यमातून महिलांना मोफत शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण तसेच ‘विश्वकर्मा योजने’तून शिलाई मशीन व १५ हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी महिलांना योजनेतील केवळ २५ टक्के रक्कम भरावी लागेल, उर्वरित रक्कम संस्था भरेल, असे सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून विंचूर परिसरातील महिलांकडून पैसे जमा करण्यात आले. फिर्यादी महिलेसह सुमारे ६४ महिलांकडून प्रत्येकी ३ हजार ५०० ते १० हजार रुपयांप्रमाणे रक्कम घेण्यात आली. तसेच पिठाची गिरणी, वॉशिंग मशीन, फ्रीज आदी वस्तू २५ टक्के रक्कम भरल्यानंतर देण्याचेही आमिष दाखविण्यात आले. मात्र, पैसे भरूनही शिलाई मशीन, रोख रक्कम किंवा वस्तू मिळाल्या नाहीत. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.

     याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आरोपींविरुद्ध सिन्नर व घोटी पोलीस ठाण्यातही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

4/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे