कृषीवार्तासामाजिक
कोळगाव शिव रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार – तहसिलदार विशाल नाईकवाडे

0
3
2
1
2
3
कोळगाव शिव रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार – तहसिलदार विशाल नाईकवाडे
कोळगाव – रुई शिव रस्त्याअभावी वयोवृद्द महिलेच्या अंत्यसंस्कारास अडथळा निर्माण झाला होता. महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने मार्ग काढत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत दैनिक लोकनामा मध्ये आज वृत्त प्रकाशित होताच त्याची निफाडचे तहसिलदार नाईकवाडे यांनी गंभीर दखल घेतली असून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल अशी माहिती दिली.
कोळगाव येथील वयोवृद्द गं.भा.चंद्रभागा यशवंत घोटेकर यांच्या निधनानंतर रस्त्याच्या अंतर्गत वादामुळे पार्थिवाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेण्यासाठी मार्गच नव्हता. हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे वादात अडकलेला आहे. त्यामुळे रस्त्याभावी अंत्यसंस्कार कसे करायचे? या विवंचनेत घोटेकर कुटुंबीय होते. त्यांनी निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना भ्रमणध्वनी वरून परिस्थिती कथन केली. परिस्थितीची जाणीव होताच, तहसिलदारांनी तातडीने देवगावचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर पगार, तलाठी विठ्ठल पोटरे, पुरुषोत्तम निकम, अमोल चव्हाण यांचे पथक घटनास्थळी पाठवले. रात्री १ वाजेपर्यंत प्रशासनाची बैठक झाली व चर्चेतून तात्पुरता मार्ग काढण्यात आला व अंत्यसंस्कार विधी पार पडला. प्रशासनाच्या वेगवान निर्णयामुळे एका कुटुंबाची तगमग संपली. त्याचबरोबर महसूल प्रशासनाच्या या कृतीचे परिसरात जोरदार स्वागत झाले. मात्र या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
◆ सदर रस्ता महसूल प्रशासनाने वर्षभरापूर्वी खुला केला होता. त्यानंतरही या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाले आहे. हा रस्ता प्राधान्याने मोजणीस घेऊन तारीख लावली होती. मात्र भूमी अभिलेख कर्मचाऱ्यास अचानक दुसरे काम लागले. त्यामुळे सदर वादी प्रतिवादी यांना नोटिसा काढण्यात येऊन पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे.
– विशाल नाईकवाडे
तहसिलदार, निफाड
0
3
2
1
2
3