लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील शव विच्छेदन गृह कार्यान्वित
नाशिक, लासलगाव :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ८४.८८ लाख रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन गृहाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर शव विच्छेदन गृहाचे काम पूर्ण होऊन ते सुरू करण्यात आले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सुमारे ८४.८८ लाख रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन गृहाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र या शव विच्छेदन गृहाची निर्मिती होऊन देखील सुरू करण्यात न आल्याने परिसरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः लक्ष घालून जिल्हा शल्यचिकित्सक यांना या ठिकाणची पाहणी करून तातडीने येथील शव विच्छेदन गृह सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लासलगाव येथे भेट देऊन पाहणी करत येथील शव विच्छेदन गृह तातडीने सुरू केले आहे.
विशेष म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून या लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेनिवर्धन करण्यात आले आहे. यासाठी १३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामास कार्यारंभ आदेश देखील मिळाला असून लवकरच या कामाला सुरुवात होऊन या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेनिवर्धन होणार आहे.