क्रिडा व मनोरंजनधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक
साई बाबांची शिकवण सामान्य माणसांच्या जीवनाला असामान्य रीतीने स्पर्शून जाते: विनीत रैना

0
3
2
1
2
1
साई बाबांची शिकवण सामान्य माणसांच्या जीवनाला असामान्य रीतीने स्पर्शून जाते: विनीत रैना
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या ‘शिरडी वाले साईं बाबा’ या आगामी मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर श्रद्धा आणि भक्तीची किमया घेऊन येत आहे. ही नवी मालिका आशा आणि करुणेत भिजलेल्या साई कथा आणि साई बाबांची शिकवण प्रेक्षकांपर्यंत घेऊन येईल. अभिनेता विनीत रैना या मालिकेत साईंची भूमिका करत आहे. ही भूमिका हा त्याच्या स्वतःच्या करकिर्दीतील मोठा बदल घडवणारा अध्याय आहे. या खास गप्पा गोष्टींमध्ये विनीत साई बाबांची भूमिका करण्याचा अनुभव, त्यातील जबाबदारी आणि एक व्यक्ती आणि अभिनेता म्हणून या भूमिकेचे महत्त्व याविषयी सांगत आहे. या मुलाखतीचे अंश:
साई बाबांसारखी अत्यंत आध्यात्मिक आणि पूजनीय व्यक्तिरेखा साकारताना कसे वाटते आहे?
खरं सांगायचं तर ही काही केवळ एक भूमिका नाही. हा एक दिव्य आशीर्वाद आहे. साईंची शिकवण मला नेहमीच प्रेरित करत आली आहे. पण प्रत्यक्ष साईंची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे माझे अहोभाग्य आहे. मला तर वाटते की या भूमिकेने मला शोधले आहे, मी या भूमिकेची निवड केलेली नाही. या सेटवरील प्रत्येक दिवस एक आध्यात्मिक अनुभव असतो.
भावनिक आणि आध्यात्मिक सखोलता असलेली ही भूमिका स्वीकारताना मनात काही संदेह होता का?
लोक ज्यांना पूजतात, त्यांची भूमिका करताना एक जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. ही भूमिका करताना केवळ त्या व्यक्तिरेखेचे दिसणे, देहबोली, हावभाव ठीकठाक असणे पुरेसे नसते. तर या व्यक्तिमत्त्वातील शांतपणा, समजूतदारपणा, प्रेमळपणा देखील अभिव्यक्त होणे गरजेचे असते. त्यासाठी समर्पण लागते, परफॉर्मन्स नाही.
इतर आध्यात्मिक मालिकांपेक्षा ‘शिरडी वाले साईं बाबा’ ही मालिका कशी वेगळी आहे?
ही मालिका चमत्काराच्या पलीकडे जाते. यामध्ये श्रद्धा, करुणा आणि परिवर्तनाच्या दैनंदिन कथांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. यामध्ये हे दाखवण्यात आले आहे की सामान्य लोकांच्या जीवनाला साई बाबांची शिकवण कशी असामान्य रीतीने स्पर्श करून जाते. यात व्यक्त होणाऱ्या भाव-भावनांशी प्रेक्षक सहज निगडीत होऊ शकतात.
‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेतून प्रेक्षकांना कोणता संदेश मिळेल?
जगाला आणखी करुणा आणि श्रद्धा यांची गरज आहे. मला आशा आहे की, या मालिकेतून प्रेक्षकांना करुणा आणि निःस्वार्थ सेवा या मूल्यांची महती समजेल.
शूटिंग दरम्यान असा एखादा क्षण होता का, जेव्हा या भूमिकेतील दिव्यत्व तुला अनुभवास आले?
अनेकदा! सेटवर अनेकदा असे क्षण आले, खास करून भक्तांशी संवाद करताना, त्यांना आशीर्वाद देताना. अशा वेळी मला ती अथांग शांतता जाणवते, जणू साई बाबांची ऊर्जा मला मार्गदर्शन देत आहे, असे वाटते. हे शब्दांत सांगणे कठीण आहे, पण हे क्षण मला हेलावून सोडतात.
तुझ्या मते आजचे प्रेक्षक, विशेषतः तरुण पिढी या मालिकेशी कशी कनेक्ट होईल?
मला वाटते, तरुण पिढी तर शांतता आणि अर्थपूर्णता यांचा शोध घेत आहे. या मालिकेत त्यांना हे सापडेल. या मालिकेत दया, श्रद्धा आणि प्रेम या भावनांचा पुरस्कार केला आहे, ज्या कालातीत भावना आहेत आणि सगळ्यांनाच त्या लागू होतात आणि आपल्याशा वाटतात.
बघा, ‘शिरडी वाले साईं बाबा’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
0
3
2
1
2
1