*सिन्नरच्या मोहदरी घाटातील लूट प्रकरणातील आरोपी अटकेत*
*सिन्नरच्या मोहदरी घाटातील लूट प्रकरणातील आरोपी अटकेत*
*लूट प्रकरणात निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील युवकांचा समावेश*
शरद लोहकरे, नाशिक जिल्हा…
सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात साडेसात लाख रुपयांची लूट व मारहाण प्रकरणी निफाड पूर्व भागातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि.२९ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सागर नंदू चौधरी हे एम.एच २८ वाय ०८३४ या मोटारसायकल वरून ते नोकरीस असलेल्या रेडियंड कॅश मॅनेजमेंट लि.चेन्नई या कंपनीचा ७ लाख ५३ हजार ४१६ लाख रुपयांचा भरणा सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटातून घेऊन जात असतांना त्यांचे मागे दोन विना क्रमांकाचे मोटार सायकलवर आलेल्या सहा अनोळखी आरोपींपैकी एका मोटार सायकलवर मागे असलेल्या आरोपीने फिर्यादीचे पाठीवर धारदार शस्त्राने वार करुन दुखापत केली तसेच इतर आरोपींनी त्यांचेकडील हॉकी स्टीकने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन रोख रक्कम असलेली बॅग घेवून नाशिक बाजुकडे त्यांचेकडील मोटार सायकलने पळून गेले म्हणुन एम.आय.डी.सी. सिन्नर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, मा.अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. निलेश पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे मार्गदर्शानाखाली एम.आय.डी.सी. सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळास भेट देवून पाहणी केली. एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणेचे एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक हे सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणे कामी नेमले. गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा शिंदे पळसे येथील अमोल अरुण ओढेकर, शुभम विजय पवार व त्याचे मित्रांनी केल्याबाबत बातमी मिळाली असता त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली व नंतर सदरचा गुन्हा त्यांनी त्यांचे साथीदार महेश सतिश पठारे रा. विंचूर ता.निफाड, गौरव प्रभाकर भवर रा. मानोरी खुर्द ता. निफाड, सागर एकनाथ चव्हाण रा. विंचुर ता. निफाड, प्रसाद आनंदा गायकवाड रा. मानोरी बु ता. येवला, गणेश रमेश गायकवाड रा. मानोरी खुर्द ता.निफाड, सुरज प्रकाश पाकळ रा. शिर्डी ता. राहता यांचे मदतीने करून रक्कम आपसा आपसात वाटून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर आरोपींकडुन गुन्ह्यातील गेलेली रोख रक्कम व वाहनासह एकूण ७,७९,००० रु. हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी महेश सतिश पठारे रा.विंचुर याचेवर लासलगाव पोलीस ठाणे येथे आर्म्स अॅक्ट व मारहाण असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. सुरज प्रकाश पाकळ याचेवर अहमदनगर जिल्ह्यात फसवणुक करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, मा.अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री.निलेश पालवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे मार्गदर्शानाखाली एम.आय.डी.सी. सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, पोलीस उपनिरिक्षक किशोर पाटील, पोलीस अंमलदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे, जयेश खाडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण कडील प्रदिप बहीरम, हेमंत गिलबीले अशांनी सदर गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.