ब्रेकिंग
विंचूर येथे कंटेनरच्या धडकेत तीन गंभीर जखमी

0
4
7
7
9
0
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; मद्यधुंद कंटेनर चालकाचा कहर, तिघे जखमी – एकाची प्रकृती गंभीर
किरण कुमार आवारे….
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एक भीषण अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने नियंत्रण गमावून दोन वाहनांना जोरदार धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
ही घटना आज दुपारी सुमारे २ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास हॉटेल वेदांत जवळ, येथे घडली. विंचूरकडून नाशिकच्या दिशेने जाणारी स्कार्पिओ (MH 01 EF 2791) व मोटारसायकल (MH 15 KJ 0938) मार्गावरून जात असताना, समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने अचानक नियंत्रण गमावून दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील पाटोदा येथील वैभव पगारे व रोहित वाघ हे दोघे जखमी झाले. अपघाताचा जोर इतका होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना विंचूर येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैभव पगारे व रोहित वाघ यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.
महामार्गावरील सुरू असलेली कामे, बेजबाबदार वाहनचालक व वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
0
4
7
7
9
0




