Breaking
क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

*राजा शिवाजी अँथम “छत्रपती” आज प्रेक्षकांच्या भेटीला

0 4 5 5 1 8

अजय-अतुल यांच्या सूरांतून हिंदवी स्वराज्याला सलामी; ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पहिले गाणे *राजा शिवाजी अँथम “छत्रपती” आज प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, १५ एप्रिल २०२६ : भारतीय इतिहासाच्या तेजस्वी वारश्याला भव्य आणि भावपूर्ण स्वरूपात साकार करणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचे पहिलं गाणं राजा शिवाजी अँथम “छत्रपती” आज अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘जिओ स्टुडिओज्’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने, देश म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक इंडियाच्या माध्यमातून सादर झालेले हे गीत प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय संगीतमय अनुभव ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी वारश्याला समर्पित असलेले हे गीत, केवळ एक गाणे नसून शौर्य, अभिमान आणि इतिहासाचा भव्य संगम आहे.

प्रख्यात संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या मराठी आणि हिंदी भाषिय आवृत्ती साठी अजय गोगावले यांच्या दमदार आणि भावस्पर्शी आवाजाची जोड लाभली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हिंदी गाणं शब्दबद्ध केलं आहे नामांकित गीतकार मनोज मुंतशिर यांनी, जे आजच्या भारतीय अस्मितेचं एक प्रतिक ठरणार आहे. तब्बल ८० गायकांच्या समूहाने साकारलेले हे गीत श्रवणीय भव्यतेचा उच्चांक गाठते. गीतातील प्रत्येक स्वर, प्रत्येक लय आणि प्रत्येक उंचावणारा सूर हा स्वराज्याच्या अभिमानाची आणि सामूहिक चेतनेची जाणीव करून देतो. राजा शिवाजी अँथम “छत्रपती” हे गीत ऐकताना केवळ संगीताचा अनुभव येत नाही, तर इतिहासातील एका महान क्षणाची पुनर्भेट घडते, आपल्या राजाबद्दल असलेला आदर, प्रेम आणि भावूक करून जाते.

भव्य दृश्यरचना आणि खोल भावनिक गाभा यांचा संगम साधणारे हे गीत केवळ नेत्रसुखद नसून अंतर्मनाला स्पर्श करणारे आहे. दमदार ताल, प्रभावी शब्दरचना आणि भावनांच्या टप्प्याटप्प्याने उंचावत जाणाऱ्या प्रवाहामुळे हे गीत श्रोत्यांच्या मनात अभिमानाची भावना जागवते. हे गाणे केवळ एका राजाच्या पराक्रमाचा गौरव करत नाही, तर स्वराज्याच्या उदयाची, लोकांच्या जागृतीची आणि सामूहिक अस्मितेच्या उभारणीची कहाणी देखील सांगते.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी या गीताचे नृत्यदिग्दर्शन केले असून, प्रत्येक दृश्यातून गीतातील भावविश्व अधिक प्रभावीपणे उलगडते. दृश्य आणि संगीत यांचा सुंदर संगम साधत, हे गीत प्रेक्षकांसमोर एक सजीव, उर्जावान आणि प्रेरणादायी अनुभव साकारते. प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारी ऊर्जा, अभिमान आणि एकात्मता ही ‘राजा शिवाजी’च्या भव्यतेची साक्ष देते.

या गीताबाबत बोलताना संगीतकार अजय-अतुल म्हणतात की , “हे गाणे फक्त भव्य असावे इतकेच आमचे ध्येय नव्हते, तर त्यात भावना, प्रामाणिकपणा आणि आदराची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे होते. प्रत्येक सूरामध्ये एक जबाबदारी आहे आणि ती म्हणजे त्या वारशाचा सन्मान राखण्याची. आम्ही या गीतामधून श्रोत्यांच्या मनात अभिमानाची आणि प्रेरणेची ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. जर या गीतामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले, तर ते आमच्यासाठी यश आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, हे गीत त्यांच्या मनात कायम राहावं, हीच खरी आपल्या महाराजांसाठी मानवंदना ठरेल.

रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज आणि बहुआयामी कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे.

‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरव, त्यातील भावगर्भता आणि भव्यता यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका प्रेरणादायी प्रवासावर घेऊन जाणार आहे.

सध्या राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाले असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अँथमच्या दमदार सुरुवातीने ‘राजा शिवाजी’च्या भव्य विश्वाची नांदी झाली असून, आगामी काळात हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक सांस्कृतिक सोहळा म्हणून समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे