सत्कार
गोवंश वाचवण्यासाठी भिलवाडा येथील युवकाची 17 हजार किलोमीटरची पदयात्रा
विंचूर येथे कासट बंधुकडून युवकाचा सत्कार

0
4
2
9
5
7
आपल्या समाजात एकीकडे तरूण वर्ग अनेक वाममार्गाला जात आहे. अनेक तरूण व्यसनाधिन होऊन गुन्हेगारी, तसेच राजकारण यांसारख्या नुकसानदायी गोष्टींकडे वाटचाल करीत आहे. मात्र याच समाजात असेही तरूण आहे की ते समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कुठल्याही मोहात न अडकता ध्येय उराशी बाळगून धाडसी कार्य करतांना आढळत आहेत. अशाच एका तरूणाच्या समाजउपयोगी धाडसाचा प्रत्यय विंचूरकरांनी नुकताच घेतला.
सोमवार दि. 12 जानेवारी रोजी निसर्ग मंगल कार्यालय येथे या युवकाची साहसी गाथा समजून घेण्यासाठी निसर्ग मंगलकार्यालयाचे संचालक संजयशेठ कासट यांनी पत्रकारांसह काही प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थांना आमंत्रित केले होते. त्यावेळी समजलेली धाडसी कथा अशी की, लहानपणापासूनच गावात गोशाळा तसेच युवा पिढी घडण्यासाठी अद्ययावत वाचनालय बांधण्याचा संकल्प करत राजस्थान मधील भीलवाडा जिल्ह्यातील आरजीया गावातील 26 वर्षीय तरुण बारा ज्योतिर्लिंग आणि चारही धामची पदयात्रा करत आहे. आजपर्यंत पंधरा हजार किलोमीटर पायी प्रवास करून विंचूर येथे आलेल्या या युवकाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
भीलवाडा येथील आरजीया गावातील शक्ती सिंग राणावत या युवकाने 2 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच सुमारे 651 दिवसांपूर्वी आपली पायी यात्रा सुरू केली. दररोज साधारणपणे 30 ते 35 किलोमीटरचा ते पायी प्रवास करतात. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, नेपाळ ,बिहार झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातून जवळपास 15 हजार किलोमीटरचा पायी प्रवास करत महाराष्ट्रातील शेवटच्या म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी प्रवास करत विंचूर येथे दाखल झालेल्या शक्ती सिंग याचा विंचूर येथे लासलगाव मर्चंट बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक संजय कासट, कांदा व्यापारी राजेंद्र कासट व त्यांचे छोटे बंधू बंटी कासट यांच्या परिवार तसेच मित्र व परिवारातर्फे पायी यात्रा सुरू असल्याबद्दल सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले असून त्रंबकेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर चारधाम पैकी राहिलेले एक द्वारका धाम व उर्वरित चार ज्योतिर्लिंगांचे दर्शन करून भीलवाडा पर्यंत परतीचा प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच मनातील संकल्प गावी जाऊन पूर्ण करणार असून तेथेच गोसेवा आणि विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वाचनालय सुरू करणार असल्याचे सांगत त्यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडील रस्ता धरला.
गावी अपघातग्रस्त गाईंची केली जाते सेवा..
राजस्थान मधील भीलवाडा जिल्ह्यातील आरजीया या छोट्याशा गावात वास्तव्यास असलेला शक्ती सिंग राणावत यांचा छोटासा युवकांचा संघटन ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून ते रस्त्यावर अपघात ग्रस्त तसेच जखमी झालेल्या गाईंची मनोभावे सेवा करतात. प्रत्येक गावात गोशाळा असावी असा या युवकांचा मानस आहे. तेच ध्येय मनाशी बाळत गोसेवा करण्याचा संकल्प करत पायी 12 ज्योतिर्लिंग आणि चार धाम यात्रा अविरतपणे सुरू आहे.
हॉटेलचे जेवण घेत नाही, गाडीवर लिफ्टही घेत नाही..
शक्ती सिंग हे पायी पदयात्रा करीत असतांना दरम्यानच्या काळात हॉटेलचे जेवणही घेत नाही. तर पुढील गावात पोहचायचे असल्यास पिक अपसाठी आलेले त्यांचे लोकांसमवेत गाडीवरही जात नाही. एका गावातून दुसर्या गावात जात असतांना त्यांच्या ओळखीच्या समाज बांधवांना त्यांच्या आगमनाची सुचना दिली जाते त्यानुसार त्यांची पुढील भाजनाची व निवासाची व्यवस्था होते. शक्ती सिंग हे मुक्काम करतांना हॉलमध्ये न झोपता बस स्टंडवर किंवा मोकळ्या जागेतच झोपतात.
0
4
2
9
5
7