संपादकीय
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन लेख
0
4
2
9
5
7
कविराज लेखक – प्रकाश निकाळे
– अण्णाभाऊ साठे म्हणतात.
जात हे वास्तव आहे गरिबी ही कृत्रिम आहे. गरीबी नष्ट करता येऊ शकते जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर असे पानं. आपल्या लेखणीला तोफ बनवून तिच्यातून क्रांतीचे तोफगोळे फेकणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ. आपल्या डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमाणसात समतेचे विद्रोह पेटवणारे शाहिर म्हणजे अण्णाभाऊ.
या महानायका चे आज स्मृतिदिन. १८ जुलै १९६९ रोजी अण्णा भाऊ अनंतात विलीन झाले. जी माणसं जगावं कसं हे समाजाला शिकवतात त्या थोर व्यक्तिमत्त्वांच आज स्मृतिदिन त्या निमित्त त्यांना आदरांजली वाहणारा मानव मुक्तीचायोद्धा लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हा विषेश अर्पण...
लोकशाहीर, लोकसाहित्यिक, गायक, नाटककार, कार्यकर्ता, परखड वक्ता व समीक्षक इत्यादी क्षेत्रांत स्वकर्तृत्वाने आपल्या प्रभाव निर्माण करणारे, स्वतःच्या लेखणीने उतरविलेल्या
साहित्याला दही दिशात लौकिक ज्यांनी मिळविला असे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावातील मातंग वाड्यात १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.
मराठी साहित्याच्या दालनात एका महान प्रतिभावंताची भर पडली. वाटेगावचा मातंगवाडा तसा गावाबाहेरच अंधाऱ्या वस्तीत पिढ्यान् पिढ्यांपासून गरिबीत पिचकळत पडलेला. मातंग समाज तसा तेव्हा अशिक्षित, गरीब, गावकुलिनांचे कोणतंही काम करावं अन् पोटाची खळगी भरायची एवढेच त्यांचे काम आणि त्याच वस्तीत भाऊराव साठे यांच्या घरी अण्णांचा जन्म झाला.मराठी साहित्यात एका तुकारामाची अभंगवाणी प्रसिद्ध आहे. तर दुसऱ्या तुकारामाची शाहिरी. समाजाबाबत विलक्षण कळवळा हे दोघांचे साम्यस्थळ. बुडती हे जन पाहवेना डोळा असे म्हणत पहिला तुकाराम उपेक्षित, वंचिता बरोबर ठाम उभा राहतो तर दुसरा तुकाराम कष्टकरी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या वेदना आपल्या काव्यातून वेशीवर टांगतो. पहिला तुकाराम म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज तर दुसरा तुकाराम म्हणजे अण्णाभाऊ साठे. आई वालूबाई आणि वडील भाऊरावांनी बाळाचे नाव तुकाराम ठेवले. जगतगुरू संत तुकारामांचे नाव त्या बाळाला लाभले अण्णांचे अखेरचे दिवस..
दीड दिवस शाळा शिकलेली व्यक्ती स्वकर्तृत्वाने वाचायला, लिहायला शिकते. हालअपेष्टा, जातीयतेचे चटके सहन करत मुंबई नगरी गाठते. स्वतःच्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या जोरावर एक उत्तम दर्जाचा ग्रामीण साहित्यिक होते, ज्यांचे साहित्य सातासमुद्रापलीकडे गेले. ज्यांनी आपल्या कलापथकाच्या माध्यमातून झोपी गेलेला, अज्ञानात, दारिद्र्यात पिढ्यान् पिढ्या पडलेला समाज जागा केला, महाराष्ट्र पालथा घातला. उपाशी-तापाशी दिवस काढले, घर-संसाराकडे दुर्लक्ष केले, पण संयुक्त महाराष्ट्रासाठी रात्री जागून काढल्या. समाज उभा केला. राष्ट्रभक्तीची ज्योत प्रखर केली. पण त्याच व्यक्तीचा शेवट दुःखात झाला. उपाशीपोटी मरावे लागले ही महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद गोष्ट आहे. मराठीतल्या ग्रामीण, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचा खूप प्रभाव पडला. अस्सल भाषेत वास्तव अण्णांनी रंगवले. त्यामुळे लाखो वाचक मिळाले. ज्या माणसाने लाखो वाचकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले त्याच माणसाला काही लोकांनी फसविले. कलापथकाचे झालेले तुकडे, जवळच्या मित्रांशी झालेला वैचारिक मतभेद यामुळे अण्णा नाराज व आधारहीन अवस्थेत अखेरीस जगले. ज्या कलाकारांसोबत रक्ताचे पाणी केले तेच कलाकार नंतर उलटले, याचा त्यांना धक्का बसला. चित्रपटात त्यांची खूपच फसवणूक झाली. दिग्दर्शक लोकांनी खूपच पैसा कमावला, पण अण्णा भाऊंना काहीच मिळाले नाही. अण्णा पैशांपेक्षा माणसांवर प्रेम करणारे होते. साधा स्वभाव यामुळे या चित्रपटाच्या रंगेल दुनियेत अण्णांची पूर्णतः फसवणूक झाली. फकिरा कादंबरीवर तयार झालेला ‘फकिरा’ या चित्रपटात अण्णांनी स्वतः सावळा नानाची भूमिका उत्कृष्ट केली, पण व्यक्तिमत्त्व साधे त्यामुळे कलावंत म्हणून पुढे आले नाहीत. मात्र दिग्दर्शन यात ते पारंगत होते.एकाच वेळी असंख्य संकटं समोर उभी राहिली. विनाकारण कर्जाचा डोंगर माथी आला. पैसा दुसऱ्यांनी वापरला, पण कर्ज यांना फेडायला लावले. आरोप-प्रत्यारोपास तोंड द्यावे लागले. यामुळे जवळचे मित्र लांब गेले. विघटन झालेल्या साऱ्या घटनांचा विपरीत परिणाम त्यांच्या मनावर झाला. आपल्या शाहिरीतून, लेखणीतून सर्वांवर अधिराज्य गाजविणाऱ्या माणसाला शेवटी वाईट व अपमानाचे दिवस सहन करावे लागले. याच मानसिक त्रासामुळे अण्णा खचून गेले. सर्व बाजूंनी संकटे आली. त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. त्यामुळे अखेरच्या काळात अण्णा भाऊ कमालीचे अस्वस्थ झाले. त्यामागची सत्यता जाणून घेणारा घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यातला कलाकार देखील खचून गेला. काहींनी मुद्दाम दारूच्या भयानक नरकात त्यांना उभे केले व लुबाडले. हे वाईट दिवस पाहण्याचे दुर्दैव नशिबात आले. शंकरभाऊंनी खूप विनंती केली, अण्णा, स्वतःला सावरा. तुम्हाला उभा महाराष्ट्र ओळखतो, महाराष्ट्र तुम्हाला कधीही विसरणार नाही. अण्णा म्हणाले, “महाराष्ट्राच्या जीवनावरच मी इंद्रपुरीसारखा रशिया देश फिरून आलो. जनतेने अपार प्रेम दिले. ही माझ्या थोर महाराष्ट्राची पुण्याई आहे.”अण्णा गावाकडील सर्वांना विसरले होते. ते असे स्वतःलाच विसरले होते. एकाकी जीवन जगू लागले. तसेच ते लिहीत राहिले. उपाशी-तापाशी, अर्धपोटी दिवस ढकलत होते. खरी-खुरी प्रेमाची माणसे या दुर्दैवी जीवन-संघर्षात दुरावली गेली. बावीस तेवीस वर्षे घाटकोपरला चिरागनगरच्या पत्र्याच्या चाळीत राहिले. अखेरच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण खात्याने मासिक ३५०/- रु. मानधन सुरू केले. ते मानधन पुरत नव्हते. काही मित्रांनी धोडा का होईना मदतीचा हात दिला. अण्णांची प्रकृती ठीक राहात नव्हती. अशा अवस्थेत अण्णा लिहीत होते. ‘अग्निदिव्य’ ही ऐतिहासिक कादंबरी लिहून पूर्ण केली. प्रकाशक म्हणून ललित प्रकाशन, पुणे यांनी अण्णांची खूप काळजी घेतली. अण्णांना काही दिवस विश्रांतीसाठी ते पुण्यात घेऊन आले होते. त्यांनी अण्णांना तेथे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. खूपच काळजी घेतली.अण्णांना विरोधी पक्षाने खूपच त्रास दिला. अण्णा समाजवादी पक्षाचे खंबीर कार्यकर्ते होते. मा. यशवंतराव चव्हाण साहेबांना अण्णांविषयी अत्यंत आदर होता. अण्णा आपल्या विचारांशी, तत्त्वांशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. स्वार्थामागे कधीच धावत गेले नाहीत. राजकीय पदांचा मोह ठेवला नाही.शंकरभाऊंनी शेवटी अण्णांचे हाल पाहून, अण्णा, गावाकडे चला, तेथे तुम्ही दुःख विसराल असे सांगितले. पण अण्णांनी ऐकले नाही. अण्णांनी आपल्या घरातल्या भिंतीवर आईचा फोटो लावला होता. आई माझ्याजवळ सदैव आहे. मला कशाचीही गरज नाही. ते वाटेगावला गेले नाहीत. अण्णा भाऊंची शंकरभाऊंना फार काळजी वाटे. अण्णा नव्या गोरेगावच्या घरात एकटेच राहत असत. अण्णांची दुसरी पत्नी जयवंताबाई २०-२१ वर्षे सोबत होती. जयवंताबाईंनी अण्णांवर खूप प्रेम केले. त्यांच्या कलेला खंबीर साथ दिली. अण्णांना शारीरिक कष्टाचे काम करू दिले नाही. त्यांनी स्वतः कुटुंबासाठी परिचारिका, भाजीविक्रेती अशी कामे केली. त्यांनी अण्णाभाऊंची प्रतिभा खुलविण्यासाठी मदत केली. पण अखेरीस दोघांमध्ये मतभेद झाले, ते कधीही भरून निघाले नाहीत. त्यामुळे अखेरीस त्या निघून गेल्या. नंतर
मधुकर, अण्णांचा मुलगा अण्णांकडे गोरेगावच्या घरात राहायला आला. थोडीफार का होईना सरकारची मदत मिळाली असली तरी अण्णा निराश झालेले होते. ज्या मनाने असंख्य धाडसी पात्रं आपल्या लिखाणातून साकारली, समाजासमोर ज्यांचा आदर्श उभा केला, मात्र तेच मन अखेरीस हतबल झाले.
मराठी साहित्यावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवून, दलित व ग्रामीण वाङ्मयाला एक प्रेरणा देऊन, उभं आयुष्य कलेसाठी ज्या माणसाने खर्च केले, ज्यांचे साहित्य सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहचले, ज्यांचा महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे महान कलावंत, शाहीर, लेखक, वक्ते, प्रामाणिक कार्यकर्ते अखेरच्या काळात असह्य यातना, हालअपेष्टा सोसत दिनांक १८ जुलै १९६९ रोजी चिरागनगरच्या झोपडीत उपाशीपोटीच सर्वांना सोडून निघून गेले. त्याच झोपडीत या महान कलावंताचे प्रेत तीन दिवस बेवारस पडले होते. शेजारी राहणाऱ्या एका मद्रासी बाईने अण्णांच्या अंगावर चादर टाकली होती. तीन दिवसांपासून पोटातं अन्नाचा घास नव्हता. उपाशीपोटी, अस्वस्थ अवस्थेत त्यांचा शेवट झाला. मराठी साहित्याचा तारा कायमचा कालवश झाला. फक्त ४९ वर्षांचे जीवन अण्णांना लाभले कवितेतून म्हणावसं वाटतं.
अशी थाप होती अण्णाची डफावर ती
वीज प्रकाश क्रांतीची कडाडणारी
जग बदल घालूनी घाव मज
सांगून गेले भिमराव म्हणारी…. |
कविराज लेखक – प्रकाश निकाळे
0
4
2
9
5
7